तहानलेल्या येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने टँकर

तहानलेल्या येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने टँकर

मुंबई : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे तहानलेल्या येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागणीचे पत्र माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातून नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना पाठविले आहे.

छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हाभरात येवला तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची स्थिती असून दिवसागणिक पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भीषण होत आहे. हा भाग मुळातच अवर्षण प्रवण आहे. अशा परिस्थितीमध्ये गावांकडून टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने पाहणी करुन टँकरला मंजूरी देण्यास प्राथमिकता देणे आवश्यक असते. मात्र अनेक दिवस प्रस्ताव प्रलंबीत राहत आहेत. त्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे का? जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का? इत्यादी निकषांचा किस काढून काही गावांचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवले जात आहेत. खरं तर टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताना देण्याऐवजी कालापव्यय केला जात असल्याने भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, सध्या येवला तालुक्यातील संभाजीनगर-सावरगांव,बदापूर, आडगांव रेपाळ,पन्हाळसाठे व रहाडी या पाच गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रलंबीत आहेत. तर कोळम खु, कोळम बु.,डोंगरगांव, खिर्डीसाठे-हनुमाननगर, पिंपळखुटे खु. अंतर्गत अहिरेवस्ती आणि कदमवस्ती अशा 5 गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रलंबीत आहे. तर नगरसुल ग्रामपंचायतीने एकोणवीस  वाड्या-वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे टँकर सुरु करण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाने अनेक दिवसांपासून मंजूरी दिलेली नाही. गणेशपूर,आडसुरेगांव, गारखेडे व देवठाण या चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर आहे. मात्र ही गांवे आजही पाण्याच्या टँकरच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येवल्यासाठी मंजूर असलेली १६ पैकी ५ टँकर अजुनही येवल्यात पोहोचलेले नाहीत. भीषण टंचाई परिस्थिती असतांनाही ११ गावांचे प्रस्ताव अनेक दिवस विविध स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबीत आहेत  ही अतिशय खेदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टंचाईग्रस्त गावांतील नागरीक  पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसलेले आहेत.  शासकीय अधिकारी टंचाईकडे दुर्लक्ष करत आहेत अशी भावना नागरीकांमध्ये निर्माण झालेली आहे. तरी, तेथील भीषण परिस्थितीचा विचार करुन टंचाईग्रस्त गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावे आणि या गावांमध्ये टँकर पोहचले की नाही,याचा आढावा घेऊन दुष्काळी भागातील नागरीकांना दिलासा द्यावा असे भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com