शिक्षक भरतीस ‘हिरवा कंदील’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नाशिक - महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्याबरोबरच शहराच्या ग्रामीण भागात नव्याने निर्माण झालेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. हे लक्षात घेऊन स्थायी समितीने मानधनावर शिक्षक भरतीला ‘हिरवा कंदील’ दाखविला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत १७, तर ऊर्दू शाळेसाठी चार शिक्षकांची भरतीप्रक्रिया लवकरच राबविली जाईल. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का दिवसागणिक वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असल्याने नवीन शाळा स्थापन करणे आवश्‍यक होते. त्यानुसार चेहेडी, म्हसरूळ व पाथर्डी येथे नवीन शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत.

नाशिक - महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्याबरोबरच शहराच्या ग्रामीण भागात नव्याने निर्माण झालेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. हे लक्षात घेऊन स्थायी समितीने मानधनावर शिक्षक भरतीला ‘हिरवा कंदील’ दाखविला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत १७, तर ऊर्दू शाळेसाठी चार शिक्षकांची भरतीप्रक्रिया लवकरच राबविली जाईल. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का दिवसागणिक वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असल्याने नवीन शाळा स्थापन करणे आवश्‍यक होते. त्यानुसार चेहेडी, म्हसरूळ व पाथर्डी येथे नवीन शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. या तिन्ही शाळांमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण, शाळांसाठी शासनाने शिक्षकांच्या जागा मंजूर न केल्याने महापालिकेने अन्य शाळांमधून तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे या शाळांसाठी मानधनावर शिक्षक भरती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आठ हजार रुपये मानधनावर पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मानधनावर शिक्षकांची भरती होईल, असे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले.

महापालिकेच्या शाळांचा वाढला टक्का
महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या सुमारे ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षापासून ९०० शिक्षकांमार्फत सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती. त्याची फलश्रुती म्हणजे तीन हजार ७६८ विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत वाढले आहेत. प्रवेशासाठी कागदपत्रे नसली तरी चालतील; पण प्रवेश देणे बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले आहे.