शिक्षकभरती प्रक्रियेला टोलवाटोलवीचे ग्रहण

प्रशांत कोतकर
गुरुवार, 24 मे 2018

नाशिक - नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा गाजावाजा करणाऱ्या शिक्षण विभागाचा अजून शिक्षकभरतीचा सावळा गोंधळ संपलेला नाही. यामुळे भरतीच्या प्रतीक्षेतील भावी शिक्षक सोशल मीडियाद्वारे सरकारला नित्याने जाग आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, अधिकारी आणि मंत्री टोलवाटोलवी करण्यातच धन्यता मानत आहेत.

नाशिक - नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा गाजावाजा करणाऱ्या शिक्षण विभागाचा अजून शिक्षकभरतीचा सावळा गोंधळ संपलेला नाही. यामुळे भरतीच्या प्रतीक्षेतील भावी शिक्षक सोशल मीडियाद्वारे सरकारला नित्याने जाग आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, अधिकारी आणि मंत्री टोलवाटोलवी करण्यातच धन्यता मानत आहेत.

राज्यात शिक्षक अतिरिक्त असल्याच्या वृत्तावरून झालेल्या सत्यशोधनात शिक्षकांच्या 23 हजार 435 जागा उलट रिक्त असल्याचेच निर्दशनास आले. शिक्षकभरती व्हावी म्हणून राज्यातील बेरोजगार शिक्षकांनी निवेदने, आंदोलने, उपोषणाचे मार्ग अवलंबले. मात्र, त्याची नावापुरतीच दखल घेण्यात आली. या बेरोजगार शिक्षकांनी अखेर सोशल मीडियाद्वारे विविध ट्रेंडच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत नव्हे, सर्वसामान्यापर्यंत पोचविण्याचे काम केले आणि अद्याप पोचवतच आहेत.

राज्यात 2010 मध्ये शेवटची "सीईटी' म्हणजे शिक्षकभरती झाली. शिक्षकभरती होण्यासंदर्भात मागणी होऊ लागल्यानंतर सरकारने 2013 मध्ये केंद्रीय पद्धतीनुसार "टीईटी' (Teacher Eligibility Test) परीक्षा घेण्याचा निर्णय केला आणि परीक्षा घेतल्या. 2014, 2015, 2016 मध्ये फक्त टीईटी परीक्षा झाल्या. सरकारने 2013 ते 16 मध्ये फक्त "टीईटी'चा गवगवा केला. आपली फसगत होत असल्याचे लक्षात येताच बेरोजगार शिक्षकांनी सरकारविरुद्ध आवाज उठवण्यास सुरवात केली. राज्यात 2010 पासून शिक्षकभरती बंद आहे. "शिक्षकभरती होणार' अशा पोकळ घोषणा आतापर्यंत झाल्या. त्यावर या क्षणापर्यंत एकही ठोस कार्यवाही झालेली नाही. सरकारने सीईटी आणि टीईटी परीक्षा घेऊन बेरोजगारांकडून निधी गोळा करण्याचे काम केले आहे, असा आरोप परीक्षार्थींकडून होत आहे.

पात्रता आणि योग्यता सिद्ध करूनही गुणवंतांच्या नशिबी बेरोजगारी व उपासमारी हा चिंतेचा विषय आहे. सरकारला त्याचे गांभीर्य नाही. रिक्त 24 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती लवकरात लवकर पारदर्शी आणि भ्रष्टाचारविरहित पद्धतीने करून गुणवंतांना न्याय द्यावा.
- पूनम गवांदे (पात्र उमेदवार, नगर)

शिक्षणमंत्र्यांच्या आतापर्यंतच्या घोषणा
28 फेब्रुवारी 2016 : तीन महिन्यांत आठ हजार जागा भरणार
12 जानेवारी 2017 : तीन महिन्यांत शिक्षकभरती करणार
31 मे 2017 : 12 हजार जागा येत्या जूनमध्ये भरणार
25 मे 2017 : आगामी दीड महिन्यात शिक्षकभरती करणार
10 फेब्रुवारी 2018 : सहा महिन्यांत 24 हजार जागा भरणार

Web Title: teacher recruitment peocess issue