फेक अकाउंटद्वारे सोशल मीडियावर शिक्षिकेची बदनामी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

रागावल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याचीच करामत - सायबर पोलिस ठाण्याकडून छडा

रागावल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याचीच करामत - सायबर पोलिस ठाण्याकडून छडा
नाशिक - उनाडक्‍या करत असल्याने शिस्तप्रिय शिक्षिकेने रागावल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने फेसबुकवर त्या शिक्षिकेच्याच नावाने फेक अकाउंट सुरू केले आणि त्यावर त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षिकेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याचा छडा लावला असता, हा प्रकार त्यांच्याच शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

शहरातील एका नामांकित शाळेत शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून फिर्यादी शिक्षिकेची ओळख आहे. 2014 -15 मध्ये त्या शाळेतील आठवी बच्या वर्गशिक्षिका होत्या. त्या वेळी वर्गातील उनाडक्‍या करणाऱ्या काहींना त्या सतत रागवत असत. दरम्यान, 25 मार्चला त्यांनी फेसबुकवरील त्यांचे स्वत:चे अकाउंट सुरू करून पाहिले असता, त्यांच्याच नावाचे आणखी एक अकाउंट असल्याचे त्यांना दिसले. त्या फेक अकाउंटवर त्यांचाच फोटो वापरला होता. दोन्ही अकाउंटच्या फ्रेंडलिस्टमध्ये 76 फ्रेंड्‌स कॉमन होते. फेक अकाउंटवरील चॅटिंग पाहिले असता, त्यावर त्यांच्याविषयी अश्‍लील कॉमेंट करून त्यांची बदनामी केल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे पीडित शिक्षिकेने सायबर पोलिस ठाण्याकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी या फेक अकाउंटसंदर्भात फेसबुकच्या व्यवस्थापनाकडे पत्रव्यवहार करून या अकाउंटसंदर्भातील माहिती मागविली होती. त्यानुसार कंपनीकडून माहिती मिळाली असता, हे अकाउंट जिओ रिलायन्स कंपनीच्या मोबाईलवरून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी या जिओ रिलायन्सकडे मोबाईल क्रमांकाची माहिती मागविली होती. ही माहिती आज उपलब्ध झाली आणि पीडित शिक्षिकेला ही माहिती दिली असता, त्या अवाक्‌ झाल्या. ज्या मोबाईलवरून फेक अकाउंट सुरू करून बदनामी करण्यात आली होती, तो 2014-15 मधील त्यांच्या इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थी होता.

पालकांनी आपल्या पाल्यांच्या हाती स्मार्टफोन देण्यापूर्वी ते त्याचा वापर कशासाठी आणि का करीत आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: लहान मुलांना स्मार्टफोन कसा वापरावा याबाबतचे शिक्षण पालकांनी दिले पाहिजे. ज्यामुळे असे गुन्हेगारी कृत्य पाल्यांकडून घडणार नाही.
- अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Web Title: Teacher's defamation on social media through fake accounts