'पाण्याचे तांत्रिक ज्ञान असलेल्यांनी सक्रिय होण्याची आवश्‍यकता '

'पाण्याचे तांत्रिक ज्ञान असलेल्यांनी सक्रिय होण्याची आवश्‍यकता '

नाशिक - जगाला पाणीटंचाईच्या समस्येला 2040 पर्यंत समोरे जावे लागेल, असे यापूर्वीचे अनुमान होते. मात्र, जानेवारीत प्रसिद्ध अहवालात ही समस्या दहा वर्षे लवकर 2030 पासून भेडसावेल, असे सूतोवाच केले आहे. पाण्याचे नियोजनबद्ध वापर करणारा देशच महासत्ता होऊ शकेल. भविष्यात पाणीवापरावरून शहरी व ग्रामीण भाग यांच्यात वाद पेटत जाणार आहे. पाण्याच्या मुद्द्यावरून 
राजकीय दबावही वाढत जाईल. पाण्याचे तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्‍तींनी सक्रिय होऊन संघटनात्मक पातळीवर एकत्रित येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी आज येथे केले. 

जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्यातर्फे जलजागृती सप्ताहानिमित्त सिंचन भवन परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय येथे झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता एस. एस. वाघमारे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे उपस्थित होते. 

श्री. माने म्हणाले, की इस्राईलसारखा देश पाण्याची कमतरता असून, स्वयंपूर्ण होऊ शकतो. आज भारतात मुबलक पाणी उपलब्ध असले, तरी भविष्यातही हीच परिस्थिती कायम राहील, असे सांगता येत नाही. मुबलक पाणी असलेल्या प्रदेशांच्या तुलनेत पाणीटंचाई असलेल्या; परंतु पाण्याचे महत्त्व ओळखलेल्या प्रदेशांचा विकास झाल्याचे चित्र बघायला मिळते. पाण्याच्या मुद्द्यावर होणारे राजकारण लक्षात घेऊन त्याविषयी लढताना ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. धरण शहरासाठी बांधले गेलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. वाढत्या शहरीकरणासोबत प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. शहरी भागातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये पाय ठेवता येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. भविष्यातील आव्हानांचे योग्य मूल्यमापन करून त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. 

श्री. वाघमारे म्हणाले, की शेतीसाठी पाणी ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. पिकासाठी पाणी ही संकल्पना रुजविण्याची गरज आहे. पाणीवापराबाबत जनजागृती होणे आवश्‍यक झाले आहे. श्री. मोरे म्हणाले, की औद्योगिक वापरासह अन्य गरजांसाठी अवघे 20 टक्‍के पाणी वापरले जाते. उर्वरित पाण्याचा शेतीसाठी वापर होतो. शहरीप्रमाणे ग्रामीण भागातही जलजागृती होण्याची गरज आहे. जलबचत ही काळाची गरज बनल्याचे पटवून देण्याची वेळ आली आहे. कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ म्हणाले, की पाण्यावर काम करणाऱ्या व्यक्‍तींचे पक्षविरहित, सर्वसमावेशक व्यासपीठ तयार झाले पाहिजे. ही समाजाची आवश्‍यकता बनली असून, त्याचा फायदाही समाजालाच होणार आहे. वाचनालयाचे अध्यक्ष 

हेमंत पोतदार यांनी प्रास्ताविक केले. शिरीष भालेराव यांनी स्वागत केले. विवेक उगलमुगले यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश महाजन यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com