जळगाव पुन्हा ४४ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

वैशाखातील वणव्यामुळे अंगाची लाही-लाही

जळगाव - मे महिन्यास सुरवात होताच उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. वैशाखातील वणवा खऱ्या अर्थाने पेटू लागल्याचा अनुभव जळगावकरांना येत असून, उन्हाच्या चटक्‍यांमुळे अंगाची लाही-लाही होत आहे. जळगावातील घसरलेले तापमान पुन्हा वर चढत असून, आज तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

वैशाखातील वणव्यामुळे अंगाची लाही-लाही

जळगाव - मे महिन्यास सुरवात होताच उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. वैशाखातील वणवा खऱ्या अर्थाने पेटू लागल्याचा अनुभव जळगावकरांना येत असून, उन्हाच्या चटक्‍यांमुळे अंगाची लाही-लाही होत आहे. जळगावातील घसरलेले तापमान पुन्हा वर चढत असून, आज तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 

जिल्ह्यात एप्रिलच्या सुरवातीला चाळीशीवर पोहोचलेला पारा मध्यंतरी खाली आला होता. परंतु मागील पाच- सहा दिवसांपूर्वी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर सूर्यदेवाने पुन्हा आग ओकणे सुरू केल्याने तापमान हळूहळू वर सरकू लागले. याशिवाय प्रचंड वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. या वाढणाऱ्या तापमानामुळे आठवड्यात जळगावातील यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. 

असह्य झळा  
वैशाख वणवा पेटू लागल्याने तापमान पुन्हा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उष्णता वाढून रस्त्यावरून जाताना चटका लागल्याप्रमाणे अंगाला झळा असह्य होत आहेत. आज सकाळी नऊ-साडेनऊपासूनच झळांचा त्रास जाणवायला लागला. महामार्ग, रस्त्यांवरून जाणेही कठीण होत असल्याने दुपारी बारापासून रस्त्यांवर काहीसा शुकशुकाट पाहावयास मिळाला. परिणामी अनेकजण सकाळीच कामे उरकून टाकत आहेत. 

तापमान ४४ अंशांवर 
गेल्या आठवड्यात जळगावचे तापमान ४० अंशांपर्यंत खाली घसरले होते. त्यात हळूहळू पुन्हा वाढ होऊन आज पारा ४४ अंशांवर स्थिरावला. गेल्या महिन्यात अर्थात १९ एप्रिलला ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पारा घसरल्याने तो ३९ अंशांपर्यंत आला होता. म्हणजे १९ एप्रिलनंतर आज (५ मे) जळगावातील तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचले.