उकाड्याने जळगावकर हैराण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पारा 43.8 अंशांवर स्थिर; तापमान कमी होण्याची शक्‍यता

पारा 43.8 अंशांवर स्थिर; तापमान कमी होण्याची शक्‍यता
जळगाव - जिल्ह्यातील वाढलेले तापमान कायम असून, वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शहराच्या तापमानाने चाळिशी पार केली आहे. आज पारा 43.8 अंशांवर कायम होता. त्यातच आठवडाभरापासून जळगावच्या वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. तापमान 42 ते 44 अंशांच्या दरम्यान कायम राहत आहे. दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला, तरी उकाडाही जाणवत होता.

गेल्या आठवड्यात सूर्य आग ओकत होता. "मे हीट'च्या दुसऱ्या आठवड्यात तर तापमान 43 अंशांवर कायम असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. त्यामुळे जळगावकरांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. उकाडा जाणवत असल्याने जळगावकरांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतात. गेल्या काही दिवसांत शहरात पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. गेल्या आठवड्यात शिडकाव्याशिवाय पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता.

पारा कमी होण्याची शक्‍यता
मॉन्सूनच्या पावसासाठी जळगावकरांना जूनची वाट पाहावी लागणार आहे. या आठवड्यात जळगावकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात तापमान कमी होण्याची शक्‍यतादेखील वर्तविली जात आहे.

सध्या शहरात उष्णतेचे वारे वाहत आहेत. त्यामुळे उकाडा वाढला आहे. मात्र, पुढील आठवड्यात तापमान कमी होऊन थंडावा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
- राधाकृष्ण लांडगे, हवामानतज्ज्ञ, ममुराबाद केंद्र