दहा लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

प्राचार्यांकडील २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला

जळगाव - शहरात काल तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आज पुन्हा घरफोडीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मेहरुणमधील अक्‍सानगर भागात चोरट्यांनी प्राचार्यांच्या बंद घरात दहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केला. शेख दाम्पत्य बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दोन लाखांच्या रोख रकमेसह २५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

प्राचार्यांकडील २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला

जळगाव - शहरात काल तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आज पुन्हा घरफोडीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मेहरुणमधील अक्‍सानगर भागात चोरट्यांनी प्राचार्यांच्या बंद घरात दहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केला. शेख दाम्पत्य बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दोन लाखांच्या रोख रकमेसह २५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

अक्‍सानगरातील प्लॉट क्र. ४९/१६ मधील खुुशबू बंगल्यात अँग्लो हायस्कूलचे प्राचार्य शेख इक्‍बाल शेख उस्मान त्यांच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी फिरदोस औरंगाबाद येथे विधी विभागाचे (लॉ) पद्‌व्युत्तर शिक्षण घेत असल्याने शनिवारी (१ ऑक्‍टोबर) सायंकाळी इक्‍बाल शेख, पत्नी शमीमबानो यांच्यासह मुलीला भेटण्यासाठी गेले होते. शेख दाम्पत्याला आरोग्याच्या काही आवश्‍यक तपासण्या करायच्या असल्याने ते तीन दिवस औरंगाबाद येथेच होते.

आणि घटना उघडकीस...
आज सकाळी दहाला इक्‍बाल शेख एकटेच घरी परतले. त्यावेळी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाची दोन्ही कुलपे व्यवस्थित होते. मात्र, मुख्य दरावाजाबाहेरील सेफ्टीडोअर आणि लाकडी दरवाजा उघडा होता. तर दोन्ही दरवाजाचे कुलूप तोडून भिंतीवर ठेवलेले होते. त्यांनी घरात जाऊन पाहिले तर स्टोअररूममधील दोन्ही कपाटे फोडून लॉकर तोडून सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. दुसऱ्या बेडरूममधील दोन कपाट फोडून त्यातील सामान आणि चार बॅगांमधील कपडे व आवश्‍यक साहित्य चोरट्यांनी पलंगावर अस्ताव्यस्त फेकलेला होता. दुसऱ्या बेडरूममध्येही चोरट्यांनी कपाट फोडलेले होते. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले २ लाख रुपये रोख आणि २५ तोळे सोन्याचे दागिने, असा दहा लाखांवर मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. 

नंदनवन कॉलनीतही मारला डल्ला
शहरातील श्रद्धा कॉलनी शेजारील नंदनवन कॉलनीतील रहिवासी इंदू रवींद्र सिन्हा यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. श्रीमती सिन्हा बाहेरगावी असल्याने याबाबत गुन्हा दाखल होऊ शकला नाही. शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार रामानंदनगर पोलिसांना कळविला आहे. आज सकाळी सिन्हा यांचे शेजारी शरद सुधाकर चव्हाण यांना घरातून निघताना शेजारील घराचे दार उघडे दिसले. डोकावून पाहिल्यावर चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे आढळून आले. चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. श्रीमती सिन्हा परतल्यावर या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यावर नेमक्‍या मुद्देमालाची माहिती मिळू शकेल.

शेजारी घरांना भरल्या कड्या
प्राचार्य शेख यांच्या घराच्या दाराचा कडीकोयंडा तोडण्यासाठी चोरट्यांनी सांडशीचा वापर केला होता, सांडशी काम झाल्यावर शेजाऱ्यांच्या घराच्या जिन्यावर फेकली. चोरीवेळी शेजारच्यांना जाग आली, तरी अडथळा येऊ नये म्हणून शेजारच्या घराच्या कड्या बाहेरून लावण्यात आल्या होत्या. 

भिंत ओलांडून आले चोरटे
शेख यांच्या बंगल्याची भिंत बऱ्यापैकी उंच आहे, चोरट्यांनी दरवाजाचा वापर न करता भिंतीवरून उड्या घेऊन आत प्रवेश केला. त्यानंतर दाराचा कडीकोयंडा तोडून निवांतपणे घरातील ऐवज लांबवला. दरवाजा ओलांडून जाणारे चोरटे निष्णात व उंचीने सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्‍यता आहे.

श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांना पचारण
घटनेची माहिती मिळताच निरीक्षक सुनील कुराडे, सहाय्यक निरीक्षक सचिन बागूल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी सायंकाळी उशिरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स