घरफोड्यांची अखंडित मालिका

घरफोड्यांची अखंडित मालिका

बॅंक, दवाखाना, विमा कार्यालयात प्रयत्न; २ लॅपटॉप लंपास 
जळगाव - शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी घेतलेल्या बैठका, अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा, त्यातून वाढलेली रात्रीची गस्त या साऱ्यांना आव्हान देत चोरट्यांनी शहरात सलग चौथ्या दिवशी दुकान, दवाखाना, विमा कंपनीचे कार्यालय फोडत धुमाकूळ घातला. नेहरू चौकाजवळच मध्यवर्ती ठिकाणावर चार ठिकाणी दुकान फोडण्याचा प्रयत्न करून चोरट्यांनी वकिलाचे कार्यालय फोडत दोन लॅपटॉप लांबविले.

मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खानदेश कॉम्प्लेक्‍समधील आयडीबीआय बॅंक व एटीएमच्या वरच्या मजल्यावर चोरट्यांनी काम फत्ते केले. पहिल्या मजल्यावरील विंग ६मध्ये सीए डी.एल. सिसोदिया सकाळी साडेआठ वाजता नेहमीप्रमाणे ऑफिसला आल्यानंतर कार्यालयाचे कुलूप तोडलेले आढळले. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शेजारील विमा कंपनीचे कार्यालय-बॅंक, वकिलांचे कार्यालय, दवाखान्यात प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना कळवून शहर पोलिसांना माहिती दिली.

दोन लॅपटॉप लंपास
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक माथुरवैश्‍य यांच्या कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कार्यालयातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करत चाळीस हजार रुपये रोख व प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरुन नेल्याचे आढळून आले आहे. 

रुग्णालयातून देवाच्या मूर्ती लंपास
डॉ. उल्हास कडूस्कर यांच्या रुग्णालयाचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील भगवान गौतम बुद्ध, श्रीकृष्णाच्या मूर्त्या, रक्तदाब तपासणीचे यंत्र, वजन मोजण्याचे मशिन, इतर वैद्यकीय तपासणीचे साहित्य आणि ड्रॉवरमधील ८० रुपयांची चिल्लर लंपास केली. 

स्लॅश लॉकने वाचवले
एका रांगेत असलेल्या कार्यालयात सीए डी.एल.सिसोदिया यांचे कार्यालय तोडण्यासाठी चोरट्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र आतून मजबूत स्लॅश लॉक असल्याने चोरट्यांना आत शिरताच आले नाही. तर मुख्य जिन्याच्या समोरच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय-बॅंक आहे, चॅनलगेटला कटावणी लावून चोरट्यांनी चक्क चॅनलगेट उखडून काढण्याचा प्रयत्न केला मात्र गेट बाहेर निघाले नाही म्हणून मोठी रक्कम वाचली.

चोरट्यांचे आवडते ठिकाण
यापूर्वी २०१२ मध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कार्यालयात चोरी होऊन चोरट्यांनी गच्चीच्या मार्गानेच तिजोरी पळवण्याचा प्रयत्न केला होता. दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र बॅंकेचे आस्थापना मुख्य कार्यालय चोरट्यांनी फोडले. त्यातील सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर बॉक्‍स तोडून जिन्यातच त्याची होळी करण्यात आली होती. रेखा गॅस एजन्सीच्या कार्यालयातून तेव्हा लॅपटॉप चोरुन नेले होते, यावेळीही पाच ठिकाणी चोरी झाली होती. 

गेंदालाल मिल भागात मंगळवारी (ता.५) शाहरुख मिर्झा यांच्या घरात अज्ञात भामट्याने शिरुन पॅंटच्या खिशातील अठरा हजार रुपये रोख, घरातील दोन मोबाईल असा ऐवज लांबवला आहे. मिर्झा यांनी शहर पोलिसांत जाऊन घटनेची माहिती कळवली होती. दुसऱ्या दिवशी मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com