अर्ध्या तासात दोन लाखांची घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

जळगाव - शहरातील रिंगरोडवरील संगम सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविला. घरातील वृद्ध दाम्पत्य बाहेर गेलेले असताना चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

जळगाव - शहरातील रिंगरोडवरील संगम सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविला. घरातील वृद्ध दाम्पत्य बाहेर गेलेले असताना चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रिंगरोडवरील संगम सोसायटीत (बी.४/६) या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये डिगंबर विश्‍वनाथ कुळकर्णी पत्नी कल्पनासह वास्तव्यास आहेत. सांगली बॅंक व नंतर आयसीआयसीआय बॅंकेतून निवृत्त झालेल्या डिगंबर कुळकर्णी यांचा मुलगा जयेश विदेशात व मुलगी दीप्ती विवाहानंतर पुण्यात आहे. बाहेरगावी जायचे असल्याने कुळकर्णी दाम्पत्य बुकिंग केलेले रेल्वे तिकीट घेण्यासाठी दुपारी ११.५५ ला घराला कुलूप लावून सोबतच निघाले. नवीपेठेतील निर्मल कम्युनिकेशनमधून तिकीट घेतल्यावर लगेच १२.३५ वाजता दोघे घरी परतले. यावेळी फ्लॅटचा कडी-कोयंडा हत्याराद्वारे वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे व त्यानंतर कपाटातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड घेऊन ते पसार झाल्याचा प्रकार त्यांना दिसून आला. 

पोलिस दाखल 
घटनेची माहिती कळविल्यावर निरीक्षक कुबेर चौरे डीबी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विचारपूस करून माहिती घेत पाहणी केल्यावर परिसरात हिंडणाऱ्या संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती. 

चोरी झालेला ऐवज
तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचा हार, एक तोळ्याची माळ, आठ ग्रॅमचे टॉप्स आदी सोन्याच्या दागिन्यांसह शंभर ग्रॅम चांदीचा प्याला, नऊ हजार दोनशे रुपये रोख असा दीड ते दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.    

नऊ महिन्यांपूर्वीही घरफोडी 
कुळकर्णी दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या इमारतीसमोरच्या फ्लॅटमधील रहिवासी आशाताई तुकाराम पाटील यांच्याकडेही मेमध्ये घरफोडी होऊन दीड लाखाचा ऐवज चोरीस गेला. या गुन्ह्यातील चोरटेही अद्याप सापडले नसून येथील रहिवाशांनी पाटील यांच्या घरी झालेल्या चोरीची यावेळी आठवण करून दिली.
 

श्‍वान घुटमळला
कुळकर्णी यांच्या घराच्या मुख्य दाराचा कडी-कोयंडा वाकवून चोरट्यांनी आतील कपाट स्क्रू ड्रायव्हरने तोडले. स्क्रू ड्रायव्हर श्‍वानपथकातील ‘हॅप्पी’ श्‍वानाला हुंगवल्यावर तो गॅलरीत व बराच वेळ दाराबाहेर आणि घरातच घुटमळला. चोरट्यांनी हाताळलेली कुठलीही वस्तू घटनास्थळी आढळून आली नाही. ठसेतज्ज्ञांनी ठसे संकलित केले असून, संशयितांचा शोध सुरू आहे.