शेळ्या मेंढ्यांच्या खाद्यासाठी ठेलारी बांधवांची कसरत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

खानदेशात उन्हाळा म्हणजे पंचेचाळीस अंश तापमान, त्यात आपली गुरे, ढोरे, शेळ्या, मेंढ्या सांभाळणे म्हणजे एक दिव्यच. जिथे प्यायला पाणी मिळत नाही तेथे दोन चारशे शेळ्या मेंढ्यांचे खाद्य आणि पाण्याची तजवीज म्हणजे ठेलारी बांधवांसाठी दररोजची कसरतच.

गणपूर (ता. चोपडा) -खानदेशात उन्हाळा म्हणजे पंचेचाळीस अंश तापमान, त्यात आपली गुरे, ढोरे, शेळ्या, मेंढ्या सांभाळणे म्हणजे एक दिव्यच. जिथे प्यायला पाणी मिळत नाही तेथे दोन चारशे शेळ्या मेंढ्यांचे खाद्य आणि पाण्याची तजवीज म्हणजे ठेलारी बांधवांसाठी दररोजची कसरतच. अशा काळात गहू आणि मक्‍याची काढणी होऊन खाली झालेल्या शेतात मेंढ्या पडलेला दाणा न दाणा शोधत असून एकेक दिवस पास करत आहेत.

गहू काढणीचे हार्वेस्टर शेतात फिरुन गेल्यानंतर किमान पोते, दोन पोते गव्हाच्या कोरड्या ओंब्या शेतीचे धन होतात. कोरडा मका कापताना, उचलताना काही भुट्टे, दाणे जमीनीवर राहतातच. असा हा राहिलेला दाणा न्‌ दाणा रानावनात फिरणाऱ्या मेंढ्याच्या पोटात जातात. दरवर्षी पश्‍चिम खानदेशातून किमान पंचवीस हजार मेंढ्या जळगाव जिल्ह्यातील शिवारामध्ये चराईसाठी येतात. अशा खाली झालेल्या क्षेत्रात मेंढपाळ त्यांना फिरवून दररोजच्या त्यांच्या चराईचा प्रश्‍न सोडवत असतात.