सत्ता लाथाडायला क्षणाचाही विलंब नाही - उद्धव ठाकरे

सत्ता लाथाडायला क्षणाचाही विलंब नाही - उद्धव ठाकरे

नाशिक - शेतात पुरेसे पीक नाही, असलेल्या पिकांचीही पाणी, खत व अन्य साधनसामग्रीअभावी झालेली दुरवस्था यांसारख्या संकटांच्या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला डोक्‍यावरील कर्जाच्या डोंगरामुळे जीवन संपवण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. शेतकरी आत्महत्याही दिवसागणिक वाढत आहेत, पण या निद्रिस्त, निर्ढावलेल्या सरकारला त्याचे काहीही सोयरसूतक नाही, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की आता बस्स, सत्ता लाथाडायला आम्हाला क्षणाचाही विलंब लागणार नाही. सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्तीची घोषणा करावी. शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामे देऊन सरकारला बाहेरून पाठिंबा देतील, अशी घोषणा त्यांनी आज येथे केली.

गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्समध्ये आज कृषी अधिवेशन झाले. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री दीपक सावंत, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत आदी उपस्थित होते. ""शिवसेनेला कुणी सल्ला देण्याची, शिकविण्याची गरज नाही. आम्ही आमचे निर्णय घेण्यास सक्षम आहोत.

सत्ता असो वा नसो, शिवसेनेने कधीही आपल्या भूमिकेशी प्रतारणा केली नाही व करणार नाही,'' असे नमूद करून ठाकरे म्हणाले, 'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी आहे. हिंमत असेल तर शिवसेनेने सत्ता सोडावी, असे वारंवार म्हटले जाते. सत्ता लाथाडायला क्षणाचा वेळ लागणार नाही, पण जे शिवसेनेवर आरोप करतात, त्या कॉंग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्र्यांबरोबर साटेलोटे असल्याने त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही.''

महिनाभर शेतकरी संपर्क अभियान
ठाकरे म्हणाले, की येत्या महिनाभरात राज्यात शेतकरी संपर्क अभियान राबविले जाणार आहे. अभियानात प्रत्येक शेतकऱ्याला सहभागी करून घेण्याची जबाबदारी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यभरातील शेतकऱ्यांचा विधानसभेवर "लॉंग मार्च' काढला जाईल. शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करू नयेत. रडण्याची भूमिका न ठेवता रडविण्याच्या भूमिकेत येण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधानांचे उपदेशाचे डोस पुरे
सत्तेसाठी सध्या भाजपकडून सर्वेक्षण सुरू आहे. शेतकरी आत्महत्या का करतोय, याचे सर्वेक्षण केल्यास वास्तव समोर येईल, असे सांगून ठाकरे म्हणाले, की पंतप्रधानांकडून "मन की बात'मधून शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस दिले जाताहेत; पण निवडणुकीत ते मन की बात ऐकवतील. तुरीचे पीक अधिक येणार असल्याचे सुब्रह्मण्यम समिटीने सुचवूनही डाळ आयात केली. तूर खरेदीत शेतकऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप केले. बंपर पीक येणार असल्याच्या सूचना देणाऱ्या शासकीय यंत्रणेचे ब्रेन मॅपिंग करा, अशी टीका ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले...

  • समृद्धी महामार्गाच्या नावाखाली समृद्ध शेतीवर वरवंटा फिरविण्याचे काम
  • कर्जमुक्ती तात्पुरती असली, तरी ऊर्जा देण्यासाठी आवश्‍यक
  • रडतात XX म्हणणाऱ्यांना आता रडविण्याची भूमिका घ्या
  • सरकारचे दळभद्री धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com