वृक्षतोडल्यास प्रति पाच हजार दंड 

वृक्षतोडल्यास प्रति पाच हजार दंड 

धुळे - पांझरा नदी पात्रातील विना परवानगी वृक्षतोडप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवा, शहरातील वडजाईरोड परिसरातील एका भूखंडावरील 25-30 वृक्ष विनापरवानगी तोडल्याप्रकरणीही संबंधितांवर गुन्हा दाखल करून प्रती वृक्ष पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने आज घेतला. प्रतीझाड दंड व गुन्ह्याचा हा नियम यापुढेही कायम राहील. 

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची आज दुपारी चारला सभा झाली. प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा आयुक्त संगीता धायगुडे, वृक्ष अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहाय्यक आयुक्त अभिजित कदम, सदस्य मनोज मोरे, प्रशांत श्रीखंडे, इस्माईल पठाण, ज्युलहा रश्‍मीबानो आकील अहमद, प्रभावती चौधरी, सुशीला इशी, जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते. 

पांझरा नदीपात्रात तळफरशीच्या कामासाठी पिंपळ, लिंब, वड यासह 30-35 झाडे तोडण्यात आली. या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही अशी तक्रार नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी केली होती. या तक्रारीवर सभेत चर्चा झाली. तळफरशीच्या कामासाठी ज्या ठेकेदाराने झाडे तोडली त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत खुलासा मागवावा असा आदेश आयुक्त धायगुडे यांनी दिला. पांझरा नदीपात्रात सर्वेक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. शहर तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारा अर्ज सचिन सोनवणे यांनी केला होता. या विषयावरही वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला. 

पाच हजार दंडासह गुन्हा 
24 व 25 डिसेंबर 2016 ला शासकीय सुटीचा फायदा घेऊन वडजाईरोड लगत सर्व्हे नंबर 393,2 बगीचा भूखंडावरील 40 ते 50 वर्षापूर्वीची जिवंत 25 ते 30 लिंबाचे वृक्ष अन्सारी हमीद हाफीज हाशीम वगैरे चार जणांनी संपूर्ण झाडाची कत्तल केली व लाकडाचीही विल्हेवाट लावली अशी तक्रार शकील इस्माईल शेख यांनी दिली होती. प्राधिकरणाच्या सदस्या जुलाहा रश्‍मीबानो आकील अहमद यांनी याप्रश्‍नी कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. या विषयावर वृक्षतोड करणाऱ्यांना प्रती झाड पाच हजार रुपये दंड करून नंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करावा असा आदेश आयुक्तांनी दिला त्याला प्राधिकरण सदस्यांनी सहमती दर्शविली. यापुढे विना परवानगी वृक्षतोड करणाऱ्यांना ही शिक्षा लागू असेल. 

मुंदडा यांना दंड कायम 
राजवाडे बॅंकेजवळील वृक्ष बोडके केल्याप्रकरणी संजय मुंदडा यांना तीन हजार रुपये दंड करण्यात आला होता. हा दंड माफ करण्याबाबत मुंदडा यांनी पत्र दिले होते. या पत्रावर चर्चा करून प्राधिकरणाने त्यांना केलेला दंड कायम ठेवला आहे. वृक्षतोडीची गरज नसलेली प्रकरणे प्राधिकरणाने नामंजूर केले. 

विविध कामांसाठी अडथळा ठरत असल्याचे कारण देत तोडण्याची परवानगी मिळावी असे अर्ज होते. यावर समितीने छायाचित्र पाहून व गरज नसतानाही मागणी झालेली असल्याचे निदर्शनास आल्याने वृक्षतोड करण्यास परवानगी नाकारली. प्राधिकरणाच्या पाहणी समितीत मनोज मोरे यांना घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. 

मनपाच्या कामासाठीही वृक्षतोड ? 
प्रभाग क्रमांक 30 मधील अण्णा भाऊ साठे नगर येथे मनपाच्या माध्यमातून घरकुल योजनेचे काम सुरू आहे. या जागेवरील वृक्षतोडीला परवानगीचा विषय होता. मात्र येथे घरकुलचे काम सुरू झाल्याने वृक्षतोडही झाल्याची शंका सदस्यांनी उपस्थित केली. यावर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे प्राधिकरणाने ठरविले. 

कर भरल्यानंतरच परवानगी 
वृक्ष प्राधिकरणासमोर येणाऱ्या वृक्ष तोडीच्या अर्जांवर निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांनी पाणीपट्टी, घरपट्टी अदा केली आहे अथवा नाही याची मालमत्ता विभागाकडून खात्री झाल्यानंतरच परवानगी द्यावी असे सहाय्यक आयुक्त कदम यांनी सुचविले. त्याला प्राधिकरणाने सहमती दर्शविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com