आदिवासीजनांच्या साक्षीने राजवडी होळी प्रज्वलित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

इव्हेंट मॅनेजमेंट; 771 वर्षांची परंपरा कायम

इव्हेंट मॅनेजमेंट; 771 वर्षांची परंपरा कायम
नंदुरबार - गेल्या 771 वर्षांची राजघराण्याची परंपरा कायम राखत आदिवासींच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या काठी (ता. अक्कलकुवा) येथील राजवडी होळी आज पहाटे पाचच्या सुमारास प्रज्वलित करण्यात आली. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या येथील होळीचे यावर्षी मात्र इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशासह अन्य भागातील उत्साही नागरिकांनी होलिकोत्सवासाठी काठी येथे गर्दी केली.

काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांच्या काळात 1246 पासून ही सामूहिक होळीची परंपरा आजही टिकून आहे. आजही पहाटे होळी पेटवण्यापूर्वी शस्त्रपूजन करण्यात आले. राजा उमेदसिंग यांच्या सरकारच्या राजगादी व शस्त्रांची पूजा करण्यात आली. आदिवासी बांधवांनी या ठिकाणची माती कपाळी धारण केली. सर्वप्रथम होळीची पूजा वडाच्या झाडाखाली झाली. त्यानंतर हनुमान मंदिर, राममंदिर, पीरबाबा दर्गा आदी ठिकाणी पूजन करण्यात आले. डोक्‍याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात तलवार असा पुरुषांचा रुबाब, तर महिलांच्या गळ्यात चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या, पायात पैंजण असा साज दिसून आला. काल (ता. 12) सायंकाळी पाचला सुरू झालेली होळीची पूर्वतयारी, पूजन करून मध्यरात्री दांडा होळीच्या स्थळावर आणण्यात आला. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास मानकऱ्यांनी होळी प्रज्वलित केली. परिसरात धन, धान्यासह समृद्धी नांदू दे, आरोग्य राहू दे, पाऊस चांगला पडू दे अशी प्रार्थना करण्यात आली.

जागतिक महोत्सव करणार
सुमारे पावणे आठशे वर्षांची परंपरा असलेल्या काठीच्या राजवडी होळीला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. होळीसाठी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे आदींसह राजकीय, सामाजिक नेते उपस्थित होते. या होळीसाठी देश विदेशातून पर्यटक यावेत यासाठी बॅनर्स, होळीची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून येत्या काही वर्षांत या महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहे.