दोन भावांसह तिघांचा 'अंजनी'त बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

एरंडोल (जि. जळगाव) - पळासदळ (ता. एरंडोल) येथील अंजनी प्रकल्पात पोहण्यास गेलेल्या दोन सख्या भावांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एक जण बुडताना बचावला आहे. ही घटना सोमवारी (ता. 1) दुपारी चारच्या सुमारास घडली. शेजारच्या गावातील सहा तरुणांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. याबाबतचे वृत्त समजताच प्रकल्पावर नागरिकांनी गर्दी केली.

सिद्धिकेश राहुल ठाकूर (वय 15), रोहित राहुल ठाकूर (वय 14) हे सख्खे भाऊ तसेच आकाश सुभाष चौधरी (वय 14, तिघे रा. एरंडोल) व श्‍याम संजय महाजन हे मित्र काल दुपारी अंजनी प्रकल्पात पोहण्यासाठी गेले. यापैकी सिद्धिकेश, रोहित ठाकूर व आकाशने जलाशयात उड्या मारल्या; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडत असल्याचे काठावरील श्‍यामला दिसले. तिघेही तरुण एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करत होते; मात्र प्रकल्पातील गाळ नुकताच काढलेला असल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. श्‍यामने तिघेही बुडत असल्याची माहिती ऍड. नितीन चौधरी यांना मोबाईलवरून दिली. चौधरी यांनी पोलिसांना कळविले.

ग्रामस्थांची धाव
प्रकल्पात तीन जण बुडाल्याचे वृत्त गावात समजताच ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी धाव घेतली. पळासदळ, धारागीर व खडकेसीम येथील दीपक भिका पवार, संजय पुंजू पवार, रवींद्र धना ठाकरे, बाळू सुकलाल ठाकरे, हरी श्‍यामसिंग जोगी या तरुणांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आजोबांची प्रकल्पात उडी शोकमग्न
आकाश चौधरी याचा बुडून मृत्यूच झाल्याचे कळताच त्याचे आजी व आजोबा शोकमग्न झाले. शोक अनावर झाल्याने आजोबांनी थेट प्रकल्पातच उडी मारली; मात्र प्रसंगावधान पाहून उपस्थितांनी त्यांना बाहेर काढल्याने सुदैवाने ते बचावले.