जिल्ह्यात 41 ठिकाणी मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

जळगाव - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकींतर्गत उद्या (3 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात 41 ठिकाणी मतदान केंद्र आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण तयारी पूर्णत्वास आली आहे. जिल्ह्यातील 34 हजार 432 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

जळगाव - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकींतर्गत उद्या (3 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात 41 ठिकाणी मतदान केंद्र आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण तयारी पूर्णत्वास आली आहे. जिल्ह्यातील 34 हजार 432 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जळगाव शहरात आर. आर. विद्यालय व भा. का. लाठी विद्यालय ही दोन मतदान केंद्रे आहेत. सकाळी आठपासून मतदानाला सुरवात होईल. याशिवाय जिल्ह्यातील तालुक्‍यांत 39 मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात एकूण 34हजार 442 मतदार आहेत. त्यात 25हजार 725 पुरुष तर 8हजार 717 स्त्री मतदार आहेत. तालुकानिहाय मतदार संख्या अशी : अमळनेर2992, चोपडा-3096, यावल-1954, रावेर-2133, मुक्ताईनगर-771, बोदवड-519, भुसावळ-2396, जळगाव 7212, धरणगाव-996, एरंडोल-1080, पारोळा- 1590, भडगाव-1284, चाळीसगाव-3359, पाचोरा-1798, जामनेर-3272.

71 सें. मी. लांब मतपत्रिका
पदवीधर मतदारसंघ निवडणुकासाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे 71 सेंटिमीटर लांबीची मतपत्रिका असणार आहे. या निवडणुकीसाठी एवढी लांब मतपत्रिका प्रथमच असणार आहे. मतदारांना मतदान करताना उमेदवारांच्या नावांसमोर 1,2,3,4, 5 असे उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रम देता येणार आहेत. निवडणूक आयोगाने पुरविलेल्या जांभळ्या रंगातच मराठी, इंग्रजी किंवा रोमन लिपीत हा पसंतीक्रम लिहावा लागणार आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना
मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व साहित्य वाटप आज अल्पबचत भवनाच्या प्रांगणात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी सांगितले की, निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी. मतपत्रिकेची अधिकची काळजी घ्यावी. गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title: vidhan parishad constituency election