जगवानींची व्यूहरचना पटेलांना मिळणार?

जगवानींची व्यूहरचना पटेलांना मिळणार?

जळगाव - विधानपरिषद निवडणुकीतील यशाचे गणित सापडलेले भाजपचे आमदार डॉ. गुरुमुख जगवानी यांची स्वतंत्र व्यूहरचना आहे. पक्षाची उमेदवारी मिळणार, या विश्‍वासावर त्यांनी सहा महिन्यांपासून नियोजनही करून ठेवले होते. मात्र, आता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज जगवानी पक्षाचे उमेदवार चंदू पटेल यांच्या पदरात आपली आयती व्यूहरचना टाकणार काय? हे त्यांच्या उमेदवारी माघारी घेण्यावर व त्यानंतरच्या घडामोडींवर अवंलबून असणार आहे.

छाननीत अर्ज बाद झाल्यामुळे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार निवडणुकीत नसेल, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराच्या दृष्टीने काहीअंशी मार्ग सोपा झाला आहे. आपला अधिकृत उमेदवारच नसल्याने शिवसेना भाजपशी युती करून जिल्ह्यात नवीन समीकरणाची सुरवात करू शकते. आता प्रश्‍न आहे तो, अपक्ष उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. जगवानी यांच्या माघारीचा. पक्षाची उमेदवारी मिळण्याची जगवानी यांना अपेक्षाच नव्हे, तर खात्री होती. या निवडणुकीचे त्यांना संपूर्ण आराखडे माहिती आहेत. भाजपची मते कमी असतानाही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळविला होता; तर गेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपतर्फे उमेदवारी दाखल करून बिनविरोध यश पदरात पाडले होते.

अर्थात, यात त्यांना भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांचा भक्कम पाठिंबा होता, शिवाय राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही त्यांना साथ होतीच. आताही जगवानींनी मतदारांची मते मिळविण्यासाठी नियोजनही केले होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. आजच्या परिस्थितीत सत्तेवर असलेल्या आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढविण्याचे धाडस ते करणार नाहीत. शिवाय, त्यांनी अपक्ष निवडणूक लढविल्यास ती भाजपविरोधात खुली बंडखोरी ठरेल आणि त्याचा फटका त्यांना तर बसेलच, परंतु नेते एकनाथराव खडसे यांनाही अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे ते उमेदवारी मागे घेतील, हे निश्‍चित आहे. जगवानी यांनीही त्याबाबत सूतोवाचही केले आहे.

आता प्रश्‍न आहे, तो जगवानी यांनी निवडणुकीतील विजयासाठी केलेली व्यूहरचना भाजप उमेदवाराच्या पदरात टाकण्याचा. जगवानी यांनी मतदार असलेला प्रत्येक नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींशी व्यक्तिगत संपर्क ठेवला आहेत. निवडणुकीतील "अर्थपूर्ण' गणितही त्यांनी प्रत्येकाशी जमविले आहे. गेल्यावेळी बिनविरोध निवडणूक होऊनही त्यांनी मतदारांशी संपर्क केला होता. यावेळी त्यांची ही व्यूहरचना तयार आहे. त्यांनी उमेदवारी माघार घेतली, तरी ते तेवढ्या ताकदीने सक्रिय होऊन ही रचना भाजप उमेदवार पटेलांच्या पारड्यात मते मिळविण्यासाठी टाकतील काय? यावरही भाजप उमेदवाराचे विजयाचे गणित अवलंबून असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com