हिंसक कारवायांविरोधात दहिवेलमध्ये "एकी'! 

हिंसक कारवायांविरोधात दहिवेलमध्ये "एकी'! 

धुळे - दहिवेल (ता. साक्री) येथील कुठल्याही गैरकृत्यांना समर्थन नाही. मात्र, त्यास विरोध म्हणून काही जणांकडून धुडगूस घालून शांतता बिघडविली जात असेल, तर तेही खपवून घेणार नाही. दहिवेलमधील कायदा- सुव्यवस्था, शांततेला भविष्यात गालबोट लागू नये म्हणून आणि अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात, हिंसक कारवाया करणाऱ्यांविरोधात आज मूक मोर्चासह रास्ता- रोको आंदोलन केले. ते कुठल्याही जातीपाती किंवा समाजाविरोधात नाही, अशा आशयाची रोखठोक भूमिका मांडत संघटित ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. 

दहिवेल (ता. साक्री) येथे इंदिरानगरातील गल्ली क्रमांक दोनमध्ये गेल्या रविवारी (ता. 19) मध्यरात्री हवालदार सुनील कोतवाल, हिरामण माळी, महेंद्र बच्छाव यांनी काही कारणावरून आदिवासी विद्यार्थी कन्हय्यालाल ठाकरे (वय 23, मूळ रा. बोदगाव, ता. साक्री) याला बेदम मारहाण केली. ते अटकेत आहेत. या प्रकरणी आदिवासी समाजातील काही तरुण कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी दहिवेल चौफुलीवर रास्ता- रोको आंदोलन केले. त्यावेळी काही जणांनी संशयितांच्या घरासह दुकानावर चाल करत दगडफेकीसह वाहनांची तोडफोड केली. दहिवेलमधील असा "राडा' अनेकांना रुचला नाही. 

दहिवेलला मूक मोर्चा 
या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नेते वसंतराव पाटील, डॉ. एस. आर. मराठे, रामदास माळी, राजेंद्र पाटील, सतीश पाटील, एकनाथ गुरव, गुलाबराव बच्छाव, वसंतराव बच्छाव, दत्तात्रय बच्छाव, सतीश बच्छाव, रामदास माळी, काशिनाथ पाटील, साहेबराव बच्छाव, कन्हय्यालाल माळी, हिंमतराव बच्छाव, बापू माळी, अविनाश बच्छाव, फकिरा बोरसे, रावसाहेब कोळी, धोंडू पाटील, एस. सी. देसले यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आज गावात मूक निषेध मोर्चा काढला. नंतर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करीत नायब तहसीलदार मोरे यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. त्याचा आशय असा ः आदिवासी समाजातील काही दुष्ट प्रवृत्तींच्या हिंसात्मक कारवायांविरोधात निवेदन आहे. दहिवेल व पंचक्रोशीतील बहुजन समाजातील गावांत काही महिन्यांपासून आदिवासी समाजातील काही असामाजिक घटकांकडून हिंसात्मक कारवाया घडत आहेत. या क्षेत्रातील सर्व गावांमध्ये सर्व समाजातील घटकांचा एकमेकांशी दृढ आणि सलोख्याचा संबंध आहे. काही महिन्यांपासून लहानसहान घटनांचे निमित्त साधून आदिवासी समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक समूहाने येऊन तोडफोड करणे, मारहाण करणे, मुलींसह महिलांची छेडछाड करणे आदी गैरप्रकार करीत आहेत. वर्दळीसह शैक्षणिक भागात वेगात मोटारसायकल चालवून दहशत निर्माण करणे, आठवडे बाजारात धिंगाणा घालणे, बसस्थानकात छेडखानी करणे आदी प्रकार वाढू लागले आहेत. कुणी याविरुद्ध बोलण्यास तयार नाही. बोलले तर "त्या' अपप्रवृत्तींकडून ऍट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखविला जातो. या संदर्भात शिवसेनेच्या दहिवेल शाखेने पाच फेब्रुवारीला निवेदनही दिले आहे. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. 

मारहाणीचा निषेधच 
दहिवेलमधील आदिवासी विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व संशयितांच्या गैरकृत्याचा निषेधच आहे. मात्र, या प्रकरणी झालेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी काही जणांनी चिथावणी दिल्यावरून काही दुकाने, वाहनांची तोडफोड झाली. महिलांसह इतरांना धक्काबुक्कीचे प्रकार घडले. गावातील शांतता बिघडून दहशतीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्याला मारहाण झाल्यानंतर पोलिसांपुढे संशयितांना शरण येण्यास ग्रामस्थांनीच भाग पाडले. असे असतानाही 21 मार्चला झालेल्या आंदोलनावेळी जो काही धुडगूस घातला गेला, काही ठिकाणी दगडफेक झाली हा प्रकारही समर्थनीय नाही. दहिवेल शांतताप्रिय शेती व्यवसायाचे गाव आहे. परंतु, वारंवार अशांतता व हिंसक स्थिती निर्माण करणाऱ्यांमुळे ग्रामस्थांची सहनशीलता संपुष्टात आली आहे. अशा अन्यायाविरुद्ध जशास- तसे उत्तर देण्याची मानसिकता तयार होऊ शकते. तसे होणे कायदा- सुव्यवस्थेसह शांततेला घातक आहे. त्यामुळे पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. 

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या 
विद्यार्थी मारहाण प्रकरणी 21 मार्चला झालेल्या आंदोलनावेळी दहिवेलमध्ये वाहने, दुकानांची तोडफोड करणाऱ्या संशयितांना अटक करावी, काही तरुण विविध घटनांचे भांडवल करून खंडणी वसुलीचे काम करतात, त्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, ऍट्रॉसिटीचा गैरवापर करून बहुजन समाजास वेठीस धरून त्रास देण्याचा प्रकार थांबवावा, मुली व महिलांची छेड काढणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, बहुजन समाजास त्रास देणाऱ्या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या दहिवेलच्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे शासकीय यंत्रणेकडे केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com