नाशिक जिल्हा परिषदेवर फडकला भगवा

नाशिक जिल्हा परिषदेवर फडकला भगवा!
नाशिक जिल्हा परिषदेवर फडकला भगवा!

नाशिक - जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये यापूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुसीमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला होता. पण यावेळी पहिल्यांदा 25 जागा मिळवत 'नंबर-वन' स्थान पटकावणाऱ्या शिवसेनेला जिल्हा परिषदेवर भगवा फडकवता येणार आहे. विशेष म्हणजे, आजवर सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादीला 19 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भाजपला 15 जागा मिळाल्या असून चौथ्या स्थानावरील काँग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले.

बागलाणमध्ये भाजपने राष्ट्रवादीची घोडदौड रोखली असून राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. देवळ्यात मात्र काँग्रेसच्या साथीने राष्ट्रवादीने तीनपैकी दोन गट जिंकले आहेत. भाजपचे आमदार डॉ. राहूल आहेर यांच्या चुलत भावजयी धनश्री आहेर या निवडून आल्या आहेत. मालेगावमध्ये पारंपारिक राजकीय लढाईत भाजपचे अद्वैय हिरे यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा यशाचा वारु रोखला आहे. शिवसेनेला दोन, तर भाजपला 5 जागा मिळाल्या आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेतील बंडाळी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली आहे. राष्ट्रवादीने तीन जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी एक जागा पटकावली आहे. सिन्नरमध्ये शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी यशाचा वरचष्मा राखला आहे. भाजपचे माजी आमदार ऍड्‌. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतिनी या एकमेव विजयी झाल्यात. त्र्यंबकेश्‍वरमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसच्या आमदार निर्मलाताई गावीत यांच्या मुलालाचा पराभव केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. इगतपुरीमध्ये सौ. गावीत आणि राष्ट्रवादीच्या यशाला शिवसेनेला लगाम घातला. सौ. गावीत यांच्या कन्या नयना आणि राष्ट्रवादीचे उदय जाधव हे, तर शिवसेनेचे तिघे विजयी झाले. त्यात माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशिला यांचा समावेश आहे. पेठमध्ये शिवसेनेचे भास्कर गावीत यांनी सर्वच जागा जिंकत विधानसभा निवडणुकीसाठीची दावेदारी ठोकली आहे.

चांदवडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा मुलगा राहूल यांना भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी पराभूत केले. पण राष्ट्रवादीच्या पालखीत आपली उमेदवारी देत काँग्रेसने वडनेरभैरव गट जिंकला. राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड हे विजयी झालेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थित झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला धोबीपछाड देत तीन जागा जिंकल्या. राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या. कळवणचा गड माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या कुटुंबियांनी राखला. काँग्रेसने आपले अस्तित्व कायम ठेवले. नांदगावमध्ये काँग्रेसचे माजी आमदार ऍड्‌. अनिल आहेर यांच्या कन्या अश्‍विनी यांनी आजीला पराभूत केले. शिवसेनेने दोन आणि भाजपने एक जागा जिंकली. निफाडमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांनी पत्नीसह अमृता पवार अन्‌ इतर तीन जागा जिंकल्या. लासलगावला भाजप, ओझरला यतीन कदम विजयी झालेत. शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांचे बंधू भास्करराव हे पराभूत झालेत. पिंपळगावचे भास्करराव बनकर यांचाही पराभूतांमध्ये समावेश आहे.

दादा भुसेंनी पाठवला राजीनामा
मालेगाव तालुक्‍यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारुन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा पाठवला आहे. हा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com