जागा मिळवण्यासाठी सराफा व्यावसायिकाला धमकी

जागा मिळवण्यासाठी सराफा व्यावसायिकाला धमकी

मजुरांना मारहाण करुन काम केले बंद; पोलिसांत तक्रारीनंतरही प्रकार सुरुच
जळगाव - व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या जागा हेरुन त्या जमिनीतील एखाद्या भागावर मालकी अथवा त्यावर इमारत असलेल्या मालकाला गुंडांकरवी धमकावून ती जागा खाली करुन घेण्याचा प्रकार जळगावसारख्या शहरातही सर्रास घडत आहे. त्याचा प्रत्यय म्हणून की काय, सराफा व्यावसायिक असलेल्या शिवाजीनगरातील कुटुंबाची जागा बळकावण्यासाठी एका धनदांडग्याने त्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित कुटुंबातील महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून हे कुटुंब प्रचंड दहशतीत आहे. 

जळगाव शहरात नवीपेठ येथील रहिवासी गीता अशोक सोनी यांच्या एकत्र कुटुंबाला वडिलोपार्जित रहिवास कमी पडत असल्याने त्यांनी वर्ष २०१३ रोजी शहरातील दूध फेडरेशनसमोर मुख्य रस्त्यावर बखळ जागा खरेदी केली होती. वर्षभरापूर्वी या जागेचे बांधकाम सुरू होऊन तीन मजली इमारत उभी राहिली आहे. इमारतीच्या तिन्ही बाजूला राजू हरिओम अग्रवाल यांच्या मालकीची जागा आहे. जागेच्या मधोमध गीता सोनी व कुटुंबीयांनी आयुष्यभराच्या कमाईतून घर व त्याखाली दुकानाचे स्वप्न साकार केले असून  बांधकाम पूर्णत्वास आले आहे. 

मजुरांना धमक्‍या
अशातच, गुरुवार ६ एप्रिलला या बांधकामावर गुंडांना पाठवून बांधकाम मजुरांना मारहाण करून पिटाळून लावण्यात आल्याची घटना घडली. बांधकामावर काम करणाऱ्या ठेकेदार, मजुरांना जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्याने कामावर कुणीही परतण्यास तयार नाही. घडला प्रकाराची तक्रार देण्यास शहर पोलिस ठाण्यात आल्यावर शहरातील एका नामचीन गुंडाकरवी सोनी कुटुंबीयांना धमकावण्यात आले. ज्या मजुराला मारहाण करून हात मोडला त्याला परस्पर धमकावून तक्रार देऊ नये म्हणून पिटाळून लावण्याचा प्रकारही घडला. 

साम, दाम, दंडाचा वापर 
गीता अशोक सोनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ही जागा बांधकाम न करताच आपल्याला देऊन टाकावी यासाठी गेल्या वर्षभरापासून संबंधितांनी प्रयत्न चालवले. त्यानंतरही तीन मजल्याचे बांधकाम उभे राहिले. मध्यस्थांच्या मार्फत झालेल्या बांधकामाच्या खर्चासह जागा सोडून द्यावी असा सतत दबाव टाकण्यात आला. जागा देतच नाही म्हणून पूर्वाश्रमीच्या गॅंगस्टर गुंडाला जमीन विकल्याचे सांगण्यात येऊन त्याच्या नावाने दहशत माजवून जागा खाली करून घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

सोनी कुटुंबीय दहशतीखाली 
नवीपेठेतील रहिवासी सोनी कुटुंबातील पाच भावंडांपैकी तिघांचे एकत्र कुटुंब आहे, त्यात हिम्मतभाई, अशोकभाई, विठ्ठल सोनी या तिघांचे मुलं सुना व नातवंडे असा तब्बल ३५ सदस्यांचा परिवार. घर अपूर्ण पडते म्हणून नवीन जागा घेत बांधकाम सुरू केले. मात्र त्यातही प्रचंड अडचणी येत असून मजुरांना मारहाण, जिवे मारण्याच्या धमक्‍यांचे सत्र सुरू असल्याने सरळमार्गी सोनी कुटुंबीय कमालीचे धास्तावले असून पोलिसांकडे मदतीला धावले आहे. शहर पोलिस ठाण्यात ६ एप्रिलला तक्रार देऊनही कारवाई होत नाही म्हणून या कुटुंबाच्या वतीने आज (१०) जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रारअर्ज सादर करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com