पाणीटंचाईच्या सावटात हागणदारीमुक्ती कशी...? 

water-shortage
water-shortage

भडगाव - वैयक्तिक शौचालय बांधकामाच्या आकडेवारीवरून जिल्हा हागणदारीमुक्ततेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. मात्र जिल्ह्यात तब्बल 859 गावांत पाणीटंचाई आहे. त्यामुळे "येथे प्यायला पाणी नाही तेथे शौचालयाच्या वापरासाठी पाणी कुठुन आणायचे" असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे? त्यामुळे शौचालय वापराबाबत प्रश्नचिन्ह आहे. याबरोबरच शौचालय वापराबाबत प्रभावी जनजागृतीचे करण्याचे आव्हान ही प्रशासनासमोर आहे. 

संपुर्ण ग्रामीण महाराष्ट्र हा हाघणदारी मुक्त म्हणून घोषित झाला आहे. 2011च्या बेस लाईन सर्वेक्षणात ज्या कुटुंबाकडे शौचालय नाहीत. अशा कुटुंबांना शौचालय बांधण्यात आले. त्या आकडेवारीवरून ग्रामीण महाराष्ट्र हाघणदारीमुक्त झाला आहे. मात्र प्रत्यक्षात बांधलेल्या शौचालयाचा वापर होतो आहे का? शौचालय बांधकामामुळे उघड्यावर बसणे बंद झाले आहे का? हा खरा प्रश्न आहे. मुळात ग्रामीण भागात सद्य:स्थितीला पाणीटंचाईमुळे पाण्याचा काटकसरीने वापर सुरू आहे. त्यामुळे शौचालय वापरासाठी पाणी आणायचे कुठुन हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. शौचालय बांधले गेले पण त्यांचा पुर्णपणे वापर होतोच आहे असे प्रशासनाने गृहीत धरून जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून घोषित केल्याचे चित्र आहे.  

शौचालयासाठी पाणी आणायचे कुठुन? 
जिल्ह्यात सद्य:स्थितीला 859 गावात टंचाई मनगुटीवर बसली आहे. यातील काही गावातील ग्रामस्थांना एक हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. त्यामुळे येथे "पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तेथे शौचालयाच्या वापरासाठी पाणी आणायचे कुठुन?" असा साधा प्रश्न टंचाईग्रस्त गावातील गावकऱ्यांकडुन विचारला जात आहे. अर्थात हे वास्तवतेला धरून आहे. 859 गावे सोडले तरी इतर गावांमध्ये नागरीकांनाही पुरेपुर पाणी उपलब्ध होतांना दिसत नाही. अनेक गावातील पाणीपुरवठा योजना या अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे येथे शौचालयाचा कितपत वापर होईल? यावर प्रश्नचिन्ह आहे. 

शौचालय नव्हे नुसते थडगे! 
गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाहीत. त्यांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत, रोजगार हमी योजनेअंतर्गत 12 हजाराचे अनुदान देऊन शौचालय बांधण्यात आले. शौचालय बांधण्यासाठी स्थानिक यंत्रणेवर वरिष्ठाचा दबाव होता. त्यामुळे त्यांनी शौचालय उभे करण्याचे आव्हान होते. लोकांना ही अनुदान मिळते आहे म्हणून त्यांनी शौचालय बांधले. मात्र प्रत्यक्षात अनेक गावात हे शौचालय नुसते थडगे म्हणून उभे राहीले आहेत. त्यांचा फारसा वापर होतांना दिसत नाही ही खरी परिस्थिती आहे. अर्थात शौचालय वापरणे हे त्यात्या कुटुंबाची जबाबदारी आहे. मात्र ग्रामीण भागात शौचालय वापरात मानसिकता अद्याप बदलतांना दिसत नाही. त्यामुळे अजुनही नाकावर रूमाल गेला म्हणजे गाव आल्याचा प्रत्यय येतो. याशिवाय शौचालयाच्या दर्जाबाबत ही प्रश्नचिन्ह आहे ते वेगळेच! तर पुढच्या टप्प्यात प्रशासनाला शौचालय वापराबाबत प्रभावी जनजागृती करावी लागणार आहे.  

पाण्याअभावी वापर नाही? 
शौचालयाचा वापरासाठी मोठ्याप्रमाणात पाणी लागते. एकावेळी एका व्यक्तीला वापरासाठी साधारणपणे 4-5 लिटर पाणी लागते. घरात 5 सदस्य राहीले तर दोन वेळेसाठी दिवसाला कमीतकमी 50 लिटर पाणी शौचालयाच्या वापरासाठी लागते. त्यामुळे एकीकडे  टंचाईग्रस्त गावांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शौचालयाच्या वापरासाठी एवढे पाणी कुठुन उपलब्ध होणार अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने जसे शौचालय बांधले तसे पुरेसे पाणी उपलब्धतेसाठी आता प्रयत्न केले पाहीजे.  शहरात नागरिकांना ग्रामीण भागाच्या तुलनेने जास्तीचे पाणी मिळते. त्यांच्याकडे तेवढी साठवण क्षमता ही असते. मात्र ग्रामीणभागात पाण्याची उपलब्धतता कमी त्यात साठवण क्षमता ही तोकडी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com