जिल्ह्यातील भूजल पातळी दोन मीटरने वाढली

जिल्ह्यातील भूजल पातळी दोन मीटरने वाढली

भूवैज्ञानिक विभागाचा अहवाल - ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा परिणाम

जळगाव - राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारण उपचारांच्या कामांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी दोन ते तीन मीटरने वाढल्याचे दिसून आले आहे. मार्च २०१७ अखेर जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींच्या पातळीची मोजणी केल्यानंतर ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.

‘जलयुक्त शिवार’ अभियानात पहिल्या टप्प्यात २३२ गावांत विविध कामे करून जलसंधारण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २२२ गावांमध्ये ही कामे सुरू आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी अडवून जिरवण्यात आले. त्यातही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २३२ गावांत ३१ हजार ९५६.५३ हेक्‍टर क्षेत्रावर जलसंधारण उपचार ७२०० कामांमधून राबविण्यात आले. त्यासाठी शासनाने १२१ कोटी रुपयांचा निधी खर्च केला.

या कामांमध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरला. त्यातच यंदा पावसाळा चांगला झाल्याने खोलीकरण केलेले नाले, गाळ काढलेले तलाव आणि सर्व उपचारांमध्ये चांगल्याप्रमाणावर पाणी अडलं आणि जिरलं सुद्धा. याचा परिणाम भूजल पातळी वाढण्यात झाला आहे.

ही पाणी पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात निरीक्षण विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही भूजल पातळी मोजली जाते. ऑक्‍टोबर महिन्यात आणि मार्च महिन्यात अशी वर्षातून दोन वेळा ही पातळी मोजली जाते. या मोजमापात अधिक अचूकता यावी यासाठी जिल्ह्यात १५४४ गावांमध्ये निरीक्षण विहिरी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यातील २६५ विहिरी व्यवहार्य नसल्याने उर्वरित १२७९ विहिरींची पातळी दर महिन्याला २५ ते ३० तारखेदरम्यान मोजण्यात येईल. यासाठी गावा गावात जलसुरक्षक प्रणालीचे प्रशिक्षण गावांतील युवकांना देण्यात आले आहे.  जलसुरक्षक या मोबाईल ॲपद्वारे ते ही माहिती अपलोड करु शकतील आणि ही माहिती साऱ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे. लवकरच ही प्रणाली कार्यान्वित होईल, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. अनुपमा पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com