पाणीपट्टी, घरपट्टीची बिले मिळणार वेगळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

जळगाव - महापालिकेने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीची वेगवेगळी बिले वाटपाचा निर्णय घेतला आहे. या वर्षीपासून त्यानुसारच वाटप करण्यात येणार आहे. मात्र, घरपट्टीची बिले हाताने लिहिलेली असतील, तर पाणीपट्टीची बिले संगणकीय असतील.

जळगाव - महापालिकेने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीची वेगवेगळी बिले वाटपाचा निर्णय घेतला आहे. या वर्षीपासून त्यानुसारच वाटप करण्यात येणार आहे. मात्र, घरपट्टीची बिले हाताने लिहिलेली असतील, तर पाणीपट्टीची बिले संगणकीय असतील.

जळगाव महापालिकेचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेस २४०० कोटी रुपये मिळणार आहेत. या योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठ्याची वाहिनी बदलण्यात येणार आहे. तसेच विविध भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी टाक्‍या उभारण्यात येणार आहेत. याशिवाय शहरात पाणी वितरणाची संपूर्ण संगणकीय यंत्रणा करण्यात येणार आहे. केंद्र व राज्याकडून त्यासाठी निधी मिळणार असून, त्यात महापालिकेचा निधीही टाकण्यात येणार आहे. अमृत योजनेंतर्गत महापालिकेला पाणी विभागाचे स्वतंत्र उत्पन्न दाखवावे लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला पाणीपट्टीची बिले स्वतंत्रपणे द्यावी लागणार आहेत आणि त्यांचा भरणाही आता स्वतंत्र असणार आहे.

१५ पासून अंमलबजावणी
दोन्ही बिले जोडून त्यांचे वाटप करण्याचे काम शुक्रवारपासून (१५ जुलै) सुरू करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय या बिलांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना बिले भरण्याची सुविधाही प्रभागातच करण्यात आली असून, ३१ जुलैपर्यंत सर्व बिलांचे वितरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांचा वेगवेगळा भरणा करता येईल. महापालिकेतर्फे त्याच्या स्वतंत्र पावत्या देण्यात येतील.

पाण्याची संगणकीय बिले
महापालिकेच्या शहरात ९० हजार मिळकती आहेत, तर साधारणत: ६० हजार नळकनेक्‍शन आहेत. त्यातही व्यावसायिक नळकनेक्‍शनची आकारणी वेगळी आहे. साधाणत: दहा हजार नळकनेक्‍शन व्यावसायिक आहेत. यात हॉटेल, रुग्णालये, लॉज यांचा समावेश आहे. बाकी सर्व नळकनेक्‍शन घरगुती आहेत. अमृत योजनेसाठी पाणीपुरवठ्याची बिलेही संगणकीय असणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने पाणीपट्टीची बिले संगणकीय केली आहेत; तर घरपट्टीची बिले हाताने लिहिलेली आहेत.