पाण्याअभावी उभ्या पिकांत नांगर

पाण्याअभावी उभ्या पिकांत नांगर

शिरपूर - ज्या पिकाने ७० वर्षे तारले, त्या भुईमुगात औत घालताना मरणयातना झाल्या; पण करायचे काय? कूपनलिका आटली. शेंगा भरल्याच नाहीत. भुईमुगाचा नुसता पालाच हाती आला. किमान बैलांना चारा होईल म्हणून नांगरटी करावी लागली... हे सांगताना ७० वर्षीय नवलसिंह राऊळ यांचे डोळे पाणावले होते.

तऱ्हाड कसबे (ता. शिरपूर) येथे राऊळ यांची तीन एकर शेती आहे. त्यांची मुले रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतरित झाली आहेत. पत्नी निलकोरबाई (वय ६०) यांना सोबतीला घेऊन नवलसिंह हिमतीने शेती करण्यासाठी सज्ज झाले. जानेवारीमध्ये तीन एकरावर भुईमूग पेरला. पण निसर्गाची चक्रेच उलटी फिरली. फेब्रुवारीत एकापाठोपाठ दोन्ही कूपनलिका आटल्या. पाण्याअभावी शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. लाखांच्या घरातला लागवडीचा खर्च पाण्यात जाणार हे दिसू लागले. एप्रिलच्या अखेरीस राऊळ यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी शेतात औत घालत नांगरटी करून शेत मोकळे केले. भर उन्हात राऊळ दाम्पत्य शेत मोकळे करण्याची कसरत करीत आहे. 

योगेश निंबा पाटील बागायतदार. साडेबावीस एकर शेती, तीन बोअरचे धनी असलेल्या पाटील यांनी गेल्या आठवड्यात दोन एकरवरील कांदा ट्रॅक्‍टरने नांगरटी करून काढून टाकला. गेल्या वर्षी ५० टन कांद्याचे उत्पन्न घेणाऱ्या पाटील यांनी डिसेंबरमध्ये कांद्याची लावणी केली होती. एकरी ४० हजार रुपयांचा खर्च करून कांदा लावला. मात्र, तिन्ही कूपनलिका आटल्या. कांद्याला देण्यासाठी पाणीच नसल्याने पाटील यांनाही शेत नांगरण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

उशाला धरण आणि रोजचे मरण
नवलसिंह राऊळ यांच्या शेतापासून काही फुटांवर जळोद लघु प्रकल्प आहे. तो फेब्रुवारीपासूनच कोरडाठाक झाला आहे. ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गाळ भरलेल्या या प्रकल्पाची साठवण व सिंचन क्षमता मंदावली आहे. या प्रकल्पासह परिसरातील विहिरींची भूजलपातळी उंचवावी, किमान कायम राहावी यासाठी जलपुनर्भरणाचे कोणतेही प्रयत्न कित्येक वर्षांत झालेले नाहीत. धरणाचा गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले नाही. आता कोरड्या धरणातून शेतकरीच गाळ काढून नेत आहेत. मात्र, पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करावयाचे असल्यास त्याची व्यापकता वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न होतील, अशी आशा शेतकऱ्यांना उरलेली नाही. दुष्काळाच्या छायेतून आपला भाग वाचविण्यासाठी, सर्वांना सोबत घेऊन लोकसहभागातून जलपुनर्भरणाचे प्रयत्न करण्यासाठी कुणी भगीरथ येईल का, याचीच प्रतीक्षा त्यांना लागून आहे. 

तीन कूपनलिका मिळून फक्त १५ मिनिटे पाणी चालते. कमी पाण्यात उत्पादन देणारी पिके लावली तरी किमान पाणी हवेच. ते नसेल तर मग फक्त पावसाच्या पाण्यावर शेती कशी होईल? इथला शेतकरी कर्ज आणि नैराश्‍याच्या विळख्यात सापडत चालला आहे.
- योगेश पाटील, शेतकरी, तऱ्हाड कसबे, ता. शिरपूर 

जळोद तलावाचा गाळ उपसून नव्याने बांधबंदिस्ती केल्यास प्रभावी जलस्रोत निर्माण होईल. जलपुनर्भरणाची कामे न झाल्याने जानेवारीपासून विहिरी, बोअर कोरडे होत आहेत. जलपुनर्भरणाचे काम हाती न घेतल्यास परिसर कायमस्वरूपी दुष्काळी होईल.
- भीमराव भाऊराव पाटील, शेतकरी, तऱ्हाड कसबे, ता. शिरपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com