स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या वादात सटाणा शहराची पाणीटंचाई

satana
satana

सटाणा : सटाणा शहर पाणीपुरवठा योजनांच्या उद्भवाचा प्रश्न निवडक स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मंजूर पाणीपुरवठा योजना या श्रेयवादामुळे मृगजळासारखे वाटू लागल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी एकही पूरक व शाश्वत पाणी योजना नसल्याने टंचाई जणूकाही पाचवीलाच पुजलेली आहे.

तालुक्यात केळझर व हरणबारी ही दोन धरणे आहेत. पैकी हरणबारी धरणाचे पाणी मालेगाव शहरासाठी व गिरणा धरणासाठी आरक्षित असल्याने तेथून पाणीयोजना राबवता येत नाही. तर सन १९९७ मध्ये बारा कोटी पाच लक्ष रुपये खर्च असलेली केळझर धरण पाणीपुरवठा योजना शासनाने मंजूर केली. मात्र शहरवासीयांसाठी नवसंजीवनी ठरणारी ही योजना धरण परिसरातील राजकीय विरोधकांमुळे आता बासनात गुंडाळली गेली आहे. त्यामुळे शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाच्या आवर्तनांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून दरवर्षी जानेवारी नंतर चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन लादले जाते. 

सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३७ हजार ७०१ इतकी होती. आजमितीस लोकसंख्येचा आकडा ४५ ते ५० हजारांवर पोहोचला आहे. प्रत्येक नागरिकास पाणी पुरावे म्हणून पालिकेला दररोज ५० ते ६० लक्ष लिटर्स पाणीपुरवठा करणे भाग पडते. सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी एकमेव उद्भव विहीर ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रात आहे. तर शहरालगत असलेल्या आरम नदीपात्रालगत चार विंधन विहिरींवर २९ अश्वशक्तीचे विद्युत पंप बसविले आहे. गिरणा नदीतील पाणी आटल्यानंतर या चार विहिरीतून उपलब्ध पाण्यावर शहरात कसाबसा पाणीपुरवठा होतो.

शहरात ११५ हातपंप, १८ विंधनविहिरींवर बसविलेले वीजपंप व दत्तक देण्यात आलेल्या १० विंधनविहिरी असा अतिरिक्त स्त्रोत असला तरी तो शाश्वत नाही. शहरातील चार जलकुंभाद्वारे ३६ ते ४० किलोमीटर अंतर्गत जलवाहिनी टाकून पाणी वितरण व्यवस्था उभारली आहे. चणकापूर धरणातून ८० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. टंचाईकाळात आवश्यकतेनुसार चार ते पाच वेळा आवर्तनाने पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात येते. त्यासाठी साडेचार लक्ष रुपये व केळझर धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचे साडेचार लक्ष रुपये भरावे लागतात. 

केळझर पाणीपुरवठा योजनेवर तब्बल चार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊनही योजना बासनात गुंडाळली गेली. सन २००७ पासून अनेक पर्याय हाताळण्यात आले. मात्र पाण्याचा स्त्रोत नसल्याने पाणी योजना प्रलंबित राहिली. दरम्यान, इतर स्त्रोतांचा विचार सोडून ठेंगोडा शिवारात साठवण बंधारा बांधून टंचाई काळात या बंधाऱ्यातील पाणी गुरुत्वाकर्षणाने सटाणा शहरास पुरविण्याचा प्रस्ताव पुढे आला. तलावासाठी १ कोटी १४ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या तलावाकरिता ठेंगोडा गावठाणातील १५ एकर जमीनीची गरज असताना ठेंगोडावासियांनी जमीन देण्यास विरोध केला. यामागेही राजकीय हस्तक्षेप हेच कारण होते. ती योजनाही आता बासनात गुंडाळली गेली आहे. 

सटाणा शहराची वाढती लोकसंख्या बघता राज्य शासनाने ५० कोटी रुपये खर्चाची एक नवीन महत्वाकांक्षी योजना मंजूर केली. या योजनेद्वारे सटाणा शहरापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पुनंद (ता.कळवण) धरणातून शहरासाठी थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सन २०३५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेता दरडोई दररोज १०० लिटर पाणी शहरवासियांना उपलब्ध होणार आहे. १८ महिन्यात ही योजना कार्यान्वित करण्याचा शासननिर्णय झाला आहे. त्यासाठी धरणातून २.३६५२ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे.

पालिकेने या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. या नियुक्तीनंतर कामाची निविदा काढून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. मात्र या योजनेसही केळझर योजनेसारखा अपशकून निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुनंद धरणातून थेट जलवाहिनीने पाणी देण्यास कळवण तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष संघटनांनी विरोध केला आहे. आता पुन्हा शासनाने या विरोधास न जुमानता पोलीस बंदोबस्तात योजना पूर्ण करावी. असे झाले नाही तर पुन्हा कोणतीही योजना होणे शक्य नाही. 

पालिकेने आरमनदीपात्रात चार ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यास शासनाची मंजुरी मिळविली. मात्र यामुळे कायमस्वरूपी स्त्रोत मिळेलच अशी सुतराम शक्यता नाही. आरम नदीपात्रात खमताने गावाजवळ साठवण तलाव बांधून आरम नदीचे पूरपाणी साठवून शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र जर तर व श्रेयवादाच्या विळख्यात पाणीपुरवठा योजना सापडल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com