नांदगाव स्थानकात एक्‍स्प्रेस रेल्वेंना थांबा मिळणार कधी? 

nandgaon
nandgaon

नांदगाव- लोकप्रतिनिधींच्या जागरूकतेचा चांगला परिणाम काय व कसा असू शकतो, याचे प्रत्यंतर नांदगावहून भुसावळ-जळगाव-नाशिककडे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अलीकडेच आला आहे. अर्थात त्याचे श्रेय जाते ते जळगावस्थित खासदार ए. टी. पाटील यांना. त्यांच्या प्रयत्नांची तुलना आता सोशल मीडियावर होऊ लागली आहे. 

अनेक वर्षांपासून नांदगावच्या रेल्वेस्थानकावरच्या ट्रेनच्या थांब्याचा विषय आला, की अशा प्रकारची तुलना हमखास होत असते. चाळीसगावला माजी खासदार ए. टी. पाटील यांनी सचखंड, अंत्योदय एक्‍स्प्रेसचे थांबे तत्काळ मिळवून दिले. पाठपुरावा केला की काय घडू शकते, याचे अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे अंत्योदय या गाडीला नुकताच चाळीसगावला थांबा मिळाला आहे. उद्या चाळीसगावला आणखी एक ट्रेन थांबणार आहे. पण नांदगावला तीन वर्षांपासून प्रवाशांची मागणी असूनही पुणे-भुसावळ, महानगरी, पवन सकाळी डाउनची सुपर एक्‍स्प्रेसपैकी एकाही गाडीला थांबा मिळाला नाही. कामायनी गाडीच्या थांब्यासाठी रेल्वे रोकोसारखी आंदोलने झाली. मात्र, रेल्वे प्रशासनाने नांदगावकरांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मात्र प्रशासनातील अधिकारी सकारात्मक असेल तर काही गोष्टी शक्‍य असतात. याचे प्रत्यंतर 29 जानेवारी 2014 ला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सूद हे नांदगाव भेटीवर आले असता त्या वेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना कामायनीच्या थांब्याचे महत्त्व पटवून दिले होते. अर्थात या चर्चेतदेखील तेव्हा भुसावळला मंडल महाव्यवस्थापक असलेल्या श्री. गुप्ता यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्री. सूद यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. 

या सर्व तपशिलाची उजळणी करण्यामागे कारण असे, की जेव्हा-जेव्हा नांदगावच्या स्थानकावरील महत्त्वाच्या ट्रेन थांबायला पाहिजे, अशी मागणी आली की त्याला जोडून निफाड, लासलगाव अशी पुस्ती जोडण्याची भूमिका ठेवल्याने धड ना लासलगाव अथवा निफाडची मागणी पूर्ण झाली ना नांदगावची. या पार्श्‍वभूमीवर भाजपचेच खासदार असलेले ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नाला मिळणारे यश लक्षात घेता नांदगाव मतदारसंघ जळगाव लोकसभेला जोडावा की काय, अशा प्रकारची पण उपहासात्मक मल्लिनाथी ऐकू येते. त्यातील विनोदाचा भाग वगळला तरी कधी काळी ब्रिटिशकालीन रेल्वे वाहतुकीचे जंक्‍शन असलेल्या नांदगाव स्थानकावर महानगरी हुतात्मा व पवन एक्‍स्प्रेस या ट्रेन कधी थांबतील, हा प्रश्‍न किती काळ दुर्लक्षित राहणार याचे उत्तर मिळायला हवे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com