आंदोलक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

येवल्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवन संपवले

येवल्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवन संपवले
येवला - येवला-लासलगाव मार्गावर सोमवारी (ता. 5) झालेल्या रास्ता रोकोसह पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपात अग्रेसर असलेला पिंपरी (ता. येवला) येथील नवनाथ भालेराव (वय 30) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्री त्यांनी विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली.

नवनाथ यांच्यावर जवळपास साडेचार लाखांचे कर्ज होते. त्यातच पिकाला भाव नाही, शासन कर्जमाफी देत नाही, अशा परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पिंपरी शिवारात भालेराव यांची आई-वडिलांच्या नावावर सव्वा दोन एकर जमीन आहे. एकत्रित कुटुंबात त्यांचे तीन भाऊ असून, नवनाथ हे सर्वात लहान व हुशार असल्याने कर्ता पुरुष म्हणून संपूर्ण शेती व कुटुंबाची देखभाल करत होते. द्राक्ष बाग लावण्यासाठी त्यांनी पिंपरी विकास सोसायटीमार्फत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून मे 2013मध्ये साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते. मात्र, मागील वर्षी अस्मानी, तर यंदा बाजारभावाचा प्रश्‍न निर्माण झाला. बागेवरही डावन्याचे व किडींचा प्रादुर्भाव झाल्याने मोठी हानी झाली. त्यामुळे कर्ज व व्याज भरण्याची चिंता त्यांना सतावत होती.