मुख्याधिकारीसाहेब हरवले आहेत... सापडल्यास संपर्क करा! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

येवला - अतिरिक्त कारभार दिल्याने येथे आठवड्यातून दोन दिवस तरी मुख्याधिकाऱ्यांची येण्याची जबाबदारी आहे. मात्र येथील प्रभारी व मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर आज येण्याचा वार असतानासुद्धा पालिका कार्यालयात ते आले नाहीत. त्यांच्या न येण्याने कामे मार्गी लागत नाहीत, म्हणून अपक्ष नगरसेवकांच्या गटाने पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर गांधीगिरी करत मुख्याधिकारीसाहेब हरवले आहेत... सापडल्यास संपर्क करा! या आशयाचे निवेदन दालनाला चिकटविले. तसेच बांधकाम अभियंतादेखील रजेचा अर्ज मंजूर नसतानाही गैरहजर राहिल्याने अभियंत्याच्या दालनालाही निवेदन चिटकवीत निषेध व्यक्त केला. 

मुख्याधिकारी राहुल वाघ यांची बदली झाल्यावर डॉ. मेणकर यांच्याकडे येथील अतिरिक्त कारभार जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र मेणकर आठ ते दहा दिवसांनंतर येथे येतात. याने विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप करत अपक्ष नगरसेवक रूपेश लोणारी, सचिन मोरे, शफिक शेख, अमजद शेख यांनी 18 तारखेला आक्रमक होत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनालाच कुलूप ठोकले, तर 19 तारखेला मांडी घालून ठिय्या आंदोलन केले. यावर मेणकर यांनी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक दयानंद जावळे यांच्यासह अपक्ष नगरसेवकांशी चर्चा करून आठवड्यातील बुधवार व गुरुवार हे दोन दिवस कार्यालयीन कामासाठी देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण ठरलेल्या वारी मेणकर येत नसल्याने पुन्हा नाराजी वाढू लागली होती. मागील आठवड्यात मुख्याधिकारी मेणकर हे ठरवून दिलेल्या वाराला एक दिवस पालिका कार्यालयात व एक दिवस कार्यालयीन कामकाजासाठी नाशिक येथे हजर होते. मात्र, या आठवड्यात आज बुधवारचा दिवस असूनही मेणकर न आल्याने अपक्ष नगरसेवकांनी पालिका कार्यालय गाठत मुख्याधिकाऱ्यांचा तपास घेतला. मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता पालिका कार्यालयात आढळून न आल्याने अपक्ष नगरसेवकांच्या गटाने मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांच्या दालनाला हरविले असल्याचे निवेदन चिकटविले. आज मनमाड पालिका कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयात तपास केला असता या दोन्ही ठिकाणी मुख्याधिकारी मेणकर आढळून आले नाहीत. यामुळेच गांधीगिरी आंदोलन केल्याचे नगरसेवक लोणारी यांनी सांगितले. 

दोन्ही मोठ्या पालिकांचे काम सांभाळून नाशिक व मुंबई येथील महापालिकेच्या कामासाठी वेळ द्यावा लागतो. येवला नगर परिषदेच्या कार्यालयीन कामासाठी नाशिक येथे असल्याने कार्यालयात उपस्थित नव्हतो. अतिरिक्त कारभार असल्याने ठरवून दिलेल्या वारांच्या दिवशीच या नगर परिषदेचे काम करावे लागते, हे समजून घ्यावे. 
-डॉ. दिलीप मेणकर, प्रभारी मुख्याधिकारी, येवला 

Web Title: Yeola news nashik