बांबू, फायटरने मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

जळगाव - शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात गुरुवारी (ता. 18) रात्री ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा पादचाऱ्यास धक्का लागण्यावरून वाद झाला. शाब्दिक वादानंतर दुचाकीवरील दोघांनी पादचारी तरुणास बांबू व फायटरने मारहाण केली. त्यात या अनोळखी तरुणाचा मृतदेह आज सकाळी जिल्हा रुग्णालयाजवळ आढळल्यानंतर पोलिसांची तपासचक्रे फिरली. मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचले असले, तरी अद्याप याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही. दोघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस झुणका- भाकर केंद्राजवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह परिसरातील रहिवाशांना दिसला. जिल्हा रुग्णालय तसेच पोलिसांना कळवून हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला गेला. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी धनराज निकुंभ हे मृत अनोळखी 40 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास करीत होते.

असा लागला तपास
दरम्यान, दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील दोन पोलिस कर्मचारी इतर गुन्ह्यांचा तपास करीत असताना, त्यांना पुष्पलता बेंडाळे चौकातील रात्री झालेल्या घटनेची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. माहितीवरून तुकारामवाडीतील संदीप वाणी याला अटक केल्यानंतर पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर संदीपने रात्री घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर संशयिताला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पांडे चौक, तसेच रेल्वेस्थानक व मारहाण केली त्या घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेत दुसरा संशयित भूषण माळी फरारी असून, त्याचा तपास सुरू आहे.

संशयिताची कबुली
संशयित संदीप वाणी, भूषण माळी तुकारामवाडीत हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कंजरवाड्यातून दारू पिऊन रात्री अकराच्या सुमारास पांडे चौकमार्गे रेल्वेस्थानकाकडे खाण्यासाठी जात होते. पांडे चौकात एकाने लिफ्ट मागितली. त्याला गाडीवर बसवून दुचाकी बेंडाळे चौकात आली असता, बेंडाळे चौकातून जाणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीचा धक्का लागला. त्यावरून झालेल्या वादातून बेंडाळे चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोरील पानटपरीच्या मागील जागेत या व्यक्तीला संदीप व भूषण याने बांबू व फायटरने मारहाण केली, अशी माहिती संशयित संदीप वाणीने पोलिसांना दिली. जखमी तरुण रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयाकडे जात असताना झुणका- भाकर केंद्राजवळ पडून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

दुपारनंतर तपासचक्र फिरले
जिल्हा रुग्णालयात सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दसोरे यांनी तपासणी केल्यानंतर व्यक्ती हा मृत असल्याचे सांगून जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून अनोळखी व्यक्तीचा तपास पोलिस शिपाई धनराज निकुंभ करीत होते. तोंडाला, डोक्‍याला जबर मारहाण झाल्याची शंका पोलिसांना होती; परंतु दुपारी दोननंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकातील मनोज सुरवाडे, विजय शांताराम पाटील हे अन्य गुन्ह्यांच्या शोधात असताना, बेंडाळे चौकात घडलेल्या गुन्ह्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यावरून सुरवाडे व पाटील यांनी संशयित वाणी याला तुकारामवाडीत लग्नसमारंभात पंगतीत वाढत असताना अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांना माहिती मिळताच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी गुन्हे तपासासाठी सूचना केल्या.

मृताची ओळख पटेना
सकाळपासूनच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी व्हॉटस्‌ऍप व अन्य माध्यमांद्वारे ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु घटनेत मारहाण करणाऱ्यांनादेखील ही व्यक्ती कोण होती, याची माहिती नसल्याने रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अजितसिंग देवरे, संदीप अराळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी संशयित वाणी याला घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. बेंडाळे चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोरील तळमजला व मोकळ्या जागेची पाहणी केली. तसेच आजूबाजूच्या लोकांना विचारणा केली.

तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीचा संबंध
बेंडाळे चौकात तीन पोलिस ठाण्यांची हद्द आहे. त्यात घडलेल्या घटनेतील संशयित एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी व त्याला पकडलेदेखील एमआयडीसी पोलिसांनीच. घटना घडली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत. घटनेतील जखमीचा मृत्यू झाला आहे तो परिसर जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत.

बेंडाळे चौकात "सीसीटीव्ही' नाही
जिल्हा पोलिस प्रशासनाने शहरातील मुख्य चौकांत गुन्ह्यांवर आळा व आरोपींची ओळख पटविण्यासाठी "सीसीटीव्ही' बसविण्यात आले आहेत; परंतु ही घटना घडली त्या चौकात "सीसीटीव्ही' नसल्याने कैद झाली नाही. त्यातच घटनेतील जखमीला कोणीतरी अनोळखी व्यक्तीने जिल्हा रुग्णालयापर्यंत आणले होते, अशी चर्चा जिल्हा रुग्णालय परिसरात सुरू आहे.

दोघा संशयितांपैकी एकाला पकडले; परंतु मारहाणीतून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला की अन्य कुठल्या कारणाने, याबाबत आताच निश्‍चित सांगता येणार नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर गुन्ह्याची नोंद केली जाणार असून, अनोळखी व्यक्ती कोण? याचादेखील लवकरच तपास लावू.
- सचिन सांगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी

Web Title: youth death by hitting