उंची वाढली, चाचणीत उत्तीर्णही; पण विगचे बिंग फुटलेच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पोलिस भरतीत त्र्यंबकच्या युवकाची बनवेगिरी, फसवणुकीबद्दल गुन्हा

पोलिस भरतीत त्र्यंबकच्या युवकाची बनवेगिरी, फसवणुकीबद्दल गुन्हा
नाशिक - पोलिस शिपाईपदासाठी सुरू असलेल्या भरतीसाठी भले बारावी पास ही शैक्षणिक अर्हता असली, तरी प्रत्यक्षात अभियांत्रिकी, विज्ञान शाखेचे बेरोजगार पदवीधर घाम गाळत आहेत. त्र्यंबकेश्‍वरच्या एका युवकाने स्वतःच्या कमी उंचीवर मात

करण्यासाठी चक्क डोक्‍यावर जाडजुड विग घातले. उंची मोजणाऱ्याच्या ते लक्षातही आले नाही आणि तो पात्रही ठरला; परंतु त्याच ठिकाणी असलेल्या एका चाणक्ष पोलिस कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्याने अखेर बिंग फुटले. युवकाची बनवेगिरी उघडकीस आल्याने त्याला बाद ठरवून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

पोलिस शिपाईपदासाठी गेल्या 22 तारखेपासून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. आज भरतीच्या चौथ्या दिवशी पाचारण करण्यात आलेल्या उमेदवारांची छाती व उंची मोजण्याचे काम सुरू होते. या दोन्ही चाचण्यांमध्ये उमेदवार पात्र ठरल्यास त्यास पुढच्या मैदानी चाचणीसाठी आणि नंतर धावण्यासाठी पात्र ठरविले जाते. पोलिस भरतीसाठी 165 सेंटिमीटरची उंची असावी लागते. यापेक्षा कमी उंची असेल, तर उमेदवार अपात्र ठरविला जातो.

त्र्यंबकेश्‍वर येथील राहुल किसन पाटील हा युवकही भरतीसाठी आला होता. त्याची छाती मोजल्यानंतर उंची मोजण्यात आली. त्यामध्ये तो पात्र ठरला; परंतु त्याचवेळी संबंधित ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या चाणाक्ष नजरेने राहुल पाटील याची बनवेगिरी लक्षात आली. त्याने राहुलच्या डोक्‍यातील केसांमध्ये हात घातला असता, त्याने विग (टोप) वापरला असल्याचे लक्षात आले. यासंदर्भात तातडीने भरती प्रक्रियेचे प्रमुख व प्रशासन विभागाचे उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. श्रीकांत धिवरे घटनास्थळी आले आणि त्यांनी विंग ताब्यात घेतला. राहुल पाटील याने स्वतःची उंची वाढावी, यासाठी केसांचा विग तर वापरलाच, शिवाय विगेच्या आतमध्येही केस लावले होते. त्यामुळे त्याची उंची वाढली होती; मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात आले. तसेच यासंदर्भात सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

उच्चशिक्षितांची धडपड
पोलिस भरतीसाठी रोज सुमारे एक हजार उमेदवारांना पाचारण केले जात आहे. सकाळच्या सत्रामध्ये मैदानी चाचणी, तर दुपारच्या सत्रात पुरुषांची एक हजार 600 मीटर धावण्याची चाचणी घेतली जात आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे बारवी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता असताना पोलिस भरतीसाठी इंजिनिअरिंग व एमबीएसारख्या मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले उमेदवारही पोलिस शिपाईपदाच्या भरतीसाठी घाम गाळत आहेत.

Web Title: youth planning for police recruitment