जि. प., पं.स.उमेदवारांना माघारीसाठी एकच दिवस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

या निवडणुकीत केवळ 13 फेब्रुवारीस सकाळी 11 ते 3 या वेळातच माघार घेता येणार आहे. या मुळे उमेदवार माघारीसाठी कमी वेळात अधिकाधिक माघारी करण्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा कस लागणार अशी चिन्हे आहेत.

नाशिक - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाना नियमात बदल करून आता उमेदवारांना माघार घेण्यासाठी एकच दिवस दिला आहे.

या निवडणुकीत केवळ 13 फेब्रुवारीस सकाळी 11 ते 3 या वेळातच माघार घेता येणार आहे. या मुळे उमेदवार माघारीसाठी कमी वेळात अधिकाधिक माघारी करण्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा कस लागणार अशी चिन्हे आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेचे 73 गट व 15 पंचायत समित्यांच्या 146 गणांसाठी 1373 उमेदवार अर्ज वैध ठरले आहेत. यातील जवळपास प्रत्येक उमेदवाराने एक पक्षातर्फे तर एक अपक्ष अर्ज भरला आहे. या मुळे अर्ज माघारीच्या दिवशी जवळपास प्रत्येक उमेदवारास माघारीसाठी निवडणूक कार्यालयात यावे लागणार असल्यामुळे पुन्हा त्या दिवशी मोठी गर्दी होणार आहे. या गर्दीमुळे उमेदवारांना आता पुढील पाच दिवसांमध्येच पक्षाच्या बंडखोरांचे तसेच अपक्षांचे माघारीसाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. माघारीच्या दिवशीच दुपारी तीन नंतर उमेदवारांना चिन्हांचेही वाटप करण्यात येणार असून अपील असणाऱ्या ठिकाणी 15 फेब्रुवारीस निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे.

Web Title: ZP election in Nashik