जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींना फटका

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींना फटका

गटांच्या आरक्षण सोडतीनंतर दिग्गजांपुढे अडचणी; नव्यांची होणार जुळवाजुळव

जळगाव - जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक दिग्गजांना आज गटांच्या आरक्षण सोडतीने धक्का दिला. काहींना दिलासा मिळाला असला, तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींना या आरक्षणाने फटका बसल्याचे सध्यातरी दिसत आहे. 

दरम्यान, अध्यक्षा प्रयाग कोळी, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, काँग्रेसचे सदस्य संजय गरुड यांचेही हक्काचे गट त्यांच्या हातून निसटले आहेत.

गरुड, डी. के. पाटलांचे काय?
आतापर्यंत जिल्हा परिषद गाजविणारे जामनेर तालुक्‍यातील मातब्बर शेंदुर्णीचे संजय गरुड, डी. के. पाटील, समाधान पाटील, नामदेव मंगरूळे, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे आदींच्या जागा महिला राखीव झाल्याने त्यांचीही गोची झाली आहे. पाळधी-लोंढरी, शहापूर-देऊळगाव, वाघाडी-बेटावद, शेंदुर्णी-नाचणखेडा, पळासखेडा-नेरी, फत्तेपूर-तोंडापूर असे सहा गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. 

उपाध्यक्ष, सभापतींची अडचण
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले एरंडोल तालुक्‍यातील तळई- उत्राण गटातून अनुसूचित जमातीतून निवडून आले होते. त्यांचा गट आता ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. शिक्षण सभापती सुरेश धनके यांचा पाल- केऱ्हाळा गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या दोघांचीही अडचण झाली आहे. समाजकल्याण सभापती दर्शना घोडेस्वार यांचा सायगाव- उंबरखेड गट अनुसूचित जाती महिलेसाठी होता, तो आता ओबीसी पुरुषसाठी राखीव झाला आहे. माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांचा कुऱ्हा- वढोदा गट राखीव झाल्याने ते इतर ठिकाणावरून संधी मिळते काय, याची चाचपणी करतील. रुईखेडा-चांगदेव गटातून पूनम कोलते या महिला राखीव जागेवर निवडून आल्या होत्या. त्यांचा गट एससी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. अंतुर्ली- उचंदा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमांगिनी तराळ या महिला राखीव जागेवर निवडून आल्या होत्या, हा गट आता एसटीसाठी आरक्षित झाला आहे; तर शिवसेनेच्या दीपाली चोपडे या मुक्ताईनगर- निमखेडी गटातून निवडून आल्या होत्या, त्यांची जागाही एसटीसाठी राखीव झाली आहे. एकूणच या आरक्षणाने दिग्गजांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गिरणा पट्ट्यात बदलले चित्र 

चाळीसगाव - गिरणा पट्ट्यात जिल्हा परिषदेच्या गटांच्या आरक्षणांचा अनेकांना फटका बसला आहे. काहींना आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी स्वतःऐवजी घरातील महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. चाळीसगाव तालुक्‍यातील एकही गट अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव झालेला नाही. त्यामुळे सायगाव- उंबरखेड गटाच्या विद्यमान सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभापती दर्शना घोडेस्वार यांना मोठा फटका बसला आहे. या गटात उंबरखेडचे रवींद्र पाटील यांना मात्र सोयीचे झाले आहे. चाळीसगाव पंचायत समितीच्या विद्यमान सभापती आशालता साळुंखे यांचा कळमडू गण राखीव झाला असला, तरी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. टाकळी प्र. चा. गटाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने बऱ्याच इच्छुकांना सोयीचे झाले आहे. बहाळ- कळमडू गटात इच्छुक असलेल्या डॉ. प्रमोद सोनवणेंचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेहुणबारे- दहिवद गटातही यंदा अनेकांना संधी मिळणार आहे. 

पाचोरा तालुका 
पाचोरा तालुक्‍यात जिल्हा परिषदेचा फटका बसला नसला, तरी लोहटार- खडकदेवळा व लोहारा- कुऱ्हाड गट हा सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अनुक्रमे प्रकाश सोमवंशी व शांताराम पाटील यांना जिल्हा परिषदेत आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कुटुंबातील महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागणार आहे. कुरंगी- बांबरुड , पिंपळगाव- शिंदाड गटाचे आरक्षण सर्वसाधारण व नगरदेवळा- बाळद गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने विद्यमान सदस्यांसह अनेकांच्या स्वप्नांना भरारी घेता येणार आहे. बांबरुड-कुरंगी गटात राष्ट्रवादीचे नितीन तावडे यांच्या आई विद्यमान सदस्या आहेत. नगरदेवळा- बाळद गटात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या पत्नी सदस्या होत्या. या दोन्ही गटात त्यांना स्वतः निवडणूक लढवता येणार आहे.

भडगावात मातब्बरांचा हिरमोड 
भडगाव तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या आरक्षणात तीन पैकी गिरड-आमडदे व कजगाव-वाडे गट अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. कजगाव- वाडे गटात आरक्षणामुळे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य मंगेश पाटील यांच्यासह निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या स्वप्नावर विरजण पडले आहे. आमडदे-गिरड गटही अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाल्याने या गटात निवडणुकीसाठी इच्छुक असलेले शेतकी संघाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, भाजपचे डॉ. संजीव पाटील यांच्यासह मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. गुढे- वडजी गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान सदस्य विकास पाटलांना निवडणूक लढवावयाचे झाल्यास त्यांना कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवावे लागणार आहे.

अमळनेरला महिलांना संधी
अमळनेर - तालुक्‍यातून जिल्हा परिषदेचे विद्यमान पाच गटातून सदस्य निवडून गेले होते. पुनर्रचनेनंतर तालुक्‍यातून एक गट कमी झाला आहे. आज निघालेल्या आरक्षण सोडतीत चार गटांपैकी तीन गटांमधून महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. यात कळमसरे-जळोद, पातोंडा-दहिवद व जानवे-शिरुड गट महिला आरक्षित झाला आहे; तर मांडळ-मुडी अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षण निघाले आहे. त्यामुळे विद्यमान सदस्यांना या आरक्षणाचा फटका बसलेला आहे. 

पारोळ्यात उत्साह
पारोळा - पंचायत समिती गणात काहींचा विशेष पुरुषांचा हिरमोड झाला असला, तरी जिल्हा परिषद गटात मात्र आरक्षण पुरुष मंडळींसाठी उत्साहवर्धक आहे. तालुक्‍यात या निवडणुकीसाठी एक नवीन गटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे एकूण चार गट झाले आहेत. गेल्या निवडणुकीत तीन पैकी दोन मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित होते, तर एक सर्वसाधारण होते. यावर्षी चार पैकी तामसवाडी- देवगाव, मंगरूळ- शिरसमणी व शेळावे ओबीसी, तर वसंतनगर सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. तीन गटात इच्छुक पुरुषांच्या लढती चुरशीच्या होतील यात शंका नाही. सध्या मनोराज पाटील, डॉ. हर्शल माने, विजय पाटील, रोहन पाटील, पराग मोरे, समीर पाटील, राजेंद्र पाटील, रामचंद्र पाटील, प्रा. आर. व्ही. पाटील ही नावे चर्चेत आहेत. 

पी. सीं.चा मार्ग मोकळा
धरणगाव - तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या तीन गट आहेत. पाळधी- चांदसर व पिंप्री- सोनवदचे आरक्षण सर्वसाधारण आहे. साळवा- बांभोरी बुद्रुक ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. सोनवद- पिंप्री गटात पी. सी. पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या मतदारसंघात गेल्या २० वर्षांपासून त्यांचे वर्चस्व आहे. पहिली दहा वर्षे ते स्वतः व  त्यानंतर त्यांच्या पत्नी वैशाली पाटील पाच वर्षे सदस्या राहिल्या आहेत. गेल्या निवडणुकीत हा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांना उमेदवारी करता आली नाही. पाळधी- चांदसर गटात रमेश माणिक पाटील यांच्या पत्नी छायाबाई पाटील विद्यमान सदस्या आहेत. आता रमेश पाटील यांना संधी उपलब्ध झाली आहे. साळवा- बांभोरी बुद्रुक गट ओबीसी महिला राखीव असला तरी, इच्छुकांची मोठी गर्दी राहणार आहे. माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जानकीराम पाटील, बांभोरीचे प्रेमराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, भोणेचे माजी सरपंच दिनेश पाटील यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांची नावे चर्चेत आहेत.

जामनेरमध्ये ‘महिलाराज’
जामनेर तालुक्‍यातील आरक्षण सोडतीने पुरुष उमेदवारांचे धाबे दणाणले असून, एकूण सातपैकी सहा गटांमध्ये आता महिला निवडल्या जाणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यात खऱ्या अर्थाने ‘महिलाराज’ सुरू होणार आहे. पहूर-वाकोद या गटालाच पुरुष उमेदवाराला संधी उपलब्ध होणार आहे. विद्यमान अध्यक्षा प्रयाग कोळी या शहापूर-देऊळगाव गटातून एस. टी. संवर्गातून निवडून आल्या होत्या. आता हा गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांचा पत्ताच कट झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com