बॉलीवूडमध्ये एन्ट्री सोपी नाही - लोपामुद्रा राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नागपूर - मॉडेलिंगमधील मोठे किताब पटकाविल्यानंतर प्रत्येक मॉडेलला ‘बॉलीवूडमधून ऑफर्स आहेत का?’ हा एक प्रश्‍न हमखास विचारला जातो. अलीकडेच मिस युनायटेड कॉन्टिनेंट स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविणारी नागपूरची लोपामुद्रा राऊत हिने मात्र बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणे सोपे नसल्याची प्रामाणिक प्रतिक्रिया दिली. नागपुरात आगमन झाल्यानंतर तिने आज (सोमवार) पत्रकारांशी संवाद साधला.

‘स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे मी आनंदित आहे. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास फार कठीण होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना दडपण तर होतेच, पण सोबतच आपल्या देशाविषयी अभिमानदेखील वाटत होता. देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळावे, हे स्वप्नच होते. ते पूर्ण झाले,’ असे लोपामुद्रा म्हणते. ‘निश्‍चय ठाम असेल तर नागपुरातील मुलीदेखील आपल्या स्वप्नांचे शिखर सहज गाठू शकतात,’ असे सांगतानाच लोपामुद्राने नागपुरात सौंदर्य स्पर्धांसाठी इच्छुक मुलींना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाल्यास नक्की पुढाकार घेईन, असेही स्पष्ट केले. ‘डाएटविषयी मी जागरूक आहे. भाज्या, फळे खाणे व भरपूर पाणी पिणे या गोष्टी नियमितपणे पाळते,’ हे ती आवर्जून सांगते. नागपूर विमानतळावर तिचे कुटुंबीय, मित्र परिवार व चाहत्यांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात स्वागत केले. लोपामुद्राने टेकडी गणपतीचे दर्शन घेऊन शहरातील एका वृद्धाश्रमाला भेट दिली. 

‘रागिणीची नव्हे वाघिणीची मुलगी’
माझी आई (रागिणी) तशी खूप कमी बोलते. पण, जेव्हा तिच्या तोंडून शब्द निघतात तेव्हा ते प्रभावीच असतात. मी स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी आईला फोन केला होता. तेव्हा आई मला ‘तू रागिणीची नाही वाघिणीची मुलगी आहे’ हे एकच वाक्‍य बोलली आणि त्याने मला खूप प्रेरणा मिळाली,’ असा अनुभव लोपामुद्राने शेअर केला.

टॅग्स