शाॅक लगा! वाढीव वीजबिलाबाबत महावितरणचे काय म्हणणे आहे वाचा...

mahavitrans view about electric bill
mahavitrans view about electric bill

नागपूर : महावितरणने जून महिन्यात भरमसाट वीजबिल पाठवून ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. ग्राहकांच्या सर्व शंका चुकीच्या ठरवित पाठविलेले बिल योग्य व अचूक असल्याचा महावितरणचा दावा आहे. त्याचवेळी महावितरणकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचा मॅसेज चांगलाच व्हायरल होतो आहे. हा मॅसेज चुकीचा असून त्यावर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

एमएसईबी की मनमानी, एमएसईबी की लूट असा हिंदीमधील संदेश सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवरून फिरत आहे. त्यात आकडेवारीचा बनाव करीत ग्राहकांच्या मनात गैरसमज परविला जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

या संदेशात तीन महिन्यांच्या 664 युनिटला 11.71 रुपये वीज दर आकारला गेला, त्यामुळे 7 हजार 775 रुपये वीज आकार लावण्यात आला. वास्तविकतेत महावितरणने बिलाचे 3 भाग केले असते तर 5 हजार 175 रुपयांचेच बिल यायला हवे होते, प्रत्यक्षात 8 हजार 400 रुपये बिल पाठविले गेले असून ही महावितरणची मनमानी असल्याचे मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

महावितरणच्या दाव्यानुसार तीन महिन्यांचे 612 युनिट असतील तर दरमहा सरासरी 103 युनिट होतील. पहिल्या 100 युनिटला 3.46 रुपये दराने 346 रुपये उर्वरित 103 युनिटचे 7.45रुपये दराने 767.35 रुपये होतील. दोघांची बेरीज केल्यास 1113.35 रुपये बिल होईल.

म्हणजेच तीन महिन्यांचे बिल 3 हजार 340.05 रुपये होईल. म्हणजेच व्हायरल मॅसेज चुकीचा व अफवा पसरविणारा असल्याचे महावितरणने म्हटले आहे. ग्राहकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता बिलाचा भरणा करण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे. 

ग्राहक संघटनेचा दावा ठरला खरा 
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीजदरासंदर्भातील याचिकेचा दावा जाहीर करताना वीजदर 5 ते 15 कमी होणार असल्याचे सांगून ऊर्जामंत्र्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी वीज ग्राहक संघटनेने सरासरी 6.7 टक्के प्रमाणे वीजदरवाढीचा दावा तपशीलवार आकडेवारीसह केला होता. वीजबिलाने हा दावा खरा ठरविला आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीसुद्धा ही बाब मान्य केली आहे. महावितरणची अकार्यक्षमता, अफाट वीज गळती, शेती पंप वीज वापराच्या नावाखाली चाललेली शासकीय अनुदानाची लूट व भ्रष्टाचार यावर नियंत्रण आणण्याचे व कठोर उपाययोजनाद्वारे राज्यातील वीजदर खाली व जागतिक स्पर्धात्मक पातळीवर आणण्याचे शिवधनुष्य पेलावे, असे जाहीर आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com