काटोल ते मुंबई व्हाया नागपूर ! मराठमोळ्या आदित्य लोहेची कलाक्षेत्रात उत्तुंग झेप 

file photo
file photo

नागपूर  : एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असेल आणि त्यासाठी कसून मेहनत करायची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेला नागपूरचा मराठमोळा युवा कलावंत आदित्य आरती रमेशराव लोहे याने दाखवून दिले. नाट्य कलावंत, कॉमेडियन, 'मोटिव्हेशनल स्पीकर' अशा विविध क्षेत्रांत अमिट छाप सोडून त्याने आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. 

गेल्या दीड दशकांपासून या क्षेत्रात असलेल्या २८ वर्षीय आदित्यला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. बालपणापासून कलाक्षेत्राची आवड असलेल्या आदित्यने शालेय शिक्षण घेत असताना संगीत, गायन, तबला वादन व नाटकांमध्ये हात आजमावणे सुरू केले. काटोल येथील नगर परिषद हायस्कूलचा विद्यार्थी असताना त्याने सर्वप्रथम राज्य बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला. नाटकात काम करीत असताना हळूहळू त्याला त्याच्यातील कलाकाराची जाणीव होत गेली. नागपुरात आल्यावर त्याच्यातील प्रतिभा आणखीणच बहरली. सामाजिक नाटकाचे लिखाण, दिग्दर्शन व अभिनय करून त्याचे अनेक व्यासपीठ गाजविले. नागपुरात स्टँडअप कॉमेडीचे जवळपास शंभरावर यशस्वी प्रयोग केलेत. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव व अभ्यास असल्यामुळे त्याने सुरुवातीला 'मी शिवाजी काशीद बोलतोय!' हा एकपात्री नाट्य प्रयोग करायला सुरूवात केली. या प्रयोगाचे दोन वर्षांत दहा यशस्वी प्रयोग केल्यानंतर २०१६ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित 'सह्याद्रीचा छावा' हा दुसरा एकपात्री नाट्य प्रयोग हाती घेतला. तब्बल दोन तास 'नॉन स्टॉप' चालणाऱ्या महाराष्ट्रातील या पहिल्याच एकपात्री प्रयोगालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याही नाट्याचे संपूर्ण महाराष्ट्रात बारा प्रयोग झालेत. त्यानंतर आदित्यने क्रांतिकारक भगतसिंग यांच्यावरील 'मैं भगतसिंह बोल रहा हूं! हा आणखी एक सादर केला. याचेही विविध ठिकाणी दहा प्रयोग झालेत. 


२०१७ मध्ये वानाडोंगरी येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचे शिक्षण प्रथमश्रेणीत पूर्ण केल्यानंतर नाटकासोबतच त्याने 'मोटिव्हेशनल स्पीकर' म्हणूनही बोलायला सुरुवात केली. शिवाजी, छत्रपती संभाजी, भगतसिंग या महान व्यक्तींसह 'चला यशस्वी होऊ या' या प्रेरणादायी विषयांवर राज्यातील विविध महाविद्यालयामध्ये व्याख्याने देत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. बंगळूरमध्ये शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सिंधुताई सपकाळ यांच्या उपस्थितीत दिलेले व्याख्यान माझ्यासाठी फार मोठा सन्मान होता, असे आदित्यने सांगितले. महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, या एकमेव उद्देशाने त्याने हा उपक्रम हाती घेतला होता. 


कला क्षेत्रात नवी उंची गाठण्यासाठी आदित्यने २०१८ मध्ये मुंबई गाठले. मुंबई विद्यापीठाच्या एनएसडीच्या धर्तीवर 'अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स' विभागात दोन वर्षांचे नाट्यक्षेत्रातील पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणासाठी देशभरातून केवळ 25 कलावंतांची निवड झाली होती. मुंबईतही आदित्यने आपली छाप सोडली. तेथील मल्हार वार्षिक महोत्सवात 'मी अप्सरा आली' या नाटकात स्त्री ची भूमिका साकारून आपण कोणतीही भूमिका साकारू शकतो, हे त्याने दाखवून दिले. मला रंगमंचावरील एक प्रामाणिक कलाकार म्हणून नाव कमवायचे आहे. आयुष्यात मी जे काही करेल, त्याने प्रेक्षकांना आनंद मिळेल आणि माझ्यातील कलेचा समाजाला फायदा व्हावा हेच माझे अंतिम ध्येय आहे. आदित्यला कुटुंबियांचाही खूप सपोर्ट मिळाला. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो, असे तो म्हणतो. 

भविष्यात इन्स्टिट्यूट उभारण्याचा मानस 


आदित्यने भविष्यात मराठी व हिंदी नाट्यक्षेत्र व चित्रपट क्षेत्रात झेप घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबईत टिव्ही सिरियल, थिएटर व चित्रपटांद्वारे त्याला स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. याशिवाय भविष्यात नागपुरात तरूणासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा व इन्स्टिट्यूट उभारण्याचा त्याचा मानस आहे. आदित्यच्या मते, नागपूर व विदर्भात प्रचंड टॅलेंट आहे. केवळ त्यांना योग्य व्यासपीठ मिळण्याची गरज आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com