सुपरच्या श्रेणीवर्धनासाठी 100 कोटी

केवल जीवनतारे
शुक्रवार, 19 मे 2017

नागपूर - अडीच दशकांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटरपासून दूर राहिले. केवळ हृदय, "सीव्हीटीएस', नेफ्रोलॉजी आणि न्यूरोलॉजीचे उपचार तेवढे होत असत. प्रत्यक्षात अतिविशेषोपचार रुग्णालय व संशोधन संस्थेचा दर्जा मिळालाच नाही. नुकतेच हृदय, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात "डीएम' अभ्यासक्रम सुरू झाले आणि सुपरच्या श्रेणीवर्धनाचा मार्ग मोकळा झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपरला 100 कोटी देण्यासाठी हिरवी झेंडी दिली. भविष्यातील आरोग्य सेवेचा वेध घेऊन सुपर स्पेशालिटीच्या श्रेणीवर्धनाचे डॉक्‍यूमेंट अधिष्ठातांच्या पुढाकाराने तयार होत आहे.

सुपर स्पेशालिटीमध्ये यावर्षी विशेष कार्यकारी पद निर्माण केले. यावर्षी "सुपर'ला शैक्षणिक दर्जा मिळाला. "नेफ्रोलॉजी' आणि "युरोलॉजी' विषयात पदव्युत्तर, तर "सीव्हीटीएस' विषयात "एमसीएच' अभ्यासक्रम सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली. येथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना लाभ होईल. महागडी उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करू दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे आरोग्यसेवा अद्ययावत करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

त्यासाठी त्यांनी बैठकाही घेतल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह नागपुरातील सर्वच आमदार यांच्याकडून मोलाची मदत मिळत असल्यानेच मेडिकल-सुपरमध्ये उपचारासह शैक्षणिक व संशोधनात्मक दर्जा वाढविण्यात यश येत आहे.

सुपरमध्ये पोटाशी संबंधित विकारांवरील "गॅस्ट्रोइंट्रोलॉजी' व हृदयाशी संबंधित "कार्डिओलॉजी'चे पदव्युत्तर "डीएम' अभ्यासक्रम सुरू झाले. दररोज हजारो रुग्णांना अद्ययावत उपचार उपलब्ध होत आहेत. युरोलॉजी, नेफ्रोलॉजी विषयात डीएम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील पाच वर्षे दरवर्षी 20 कोटी सुपरला मिळणार आहेत.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्टाता, मेडिकल-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.