पर्यटन विकासासाठी फक्त दीड कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नागपूर - व्याघ्रभूमी, निसर्ग पर्यटन, खाण पर्यटन व धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या नागपूर जिल्ह्याची वाटचाल टुरिझम डेस्टीनेशनकडे नेण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील चार स्थळांच्या विकासासाठी 12 कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. त्यातील फक्त दीड कोटी निधी प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागपूर टुरिझम डेस्टिनेशन कसे होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

कृषी, औद्योगिक, नैसर्गिक पर्यटन, व्याघ्रभूमी व शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या नागपूर जिल्हा पर्यटनासाठीही खास आहे. जिल्ह्यातील अनेक स्थळे आपले वेगळेपण टिकवून आहेत. या स्थळांना आधुनिकतेची जोड देऊन त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. वैविध्यपूर्ण अशा जिल्ह्यातील चार स्थळांना नवी झळाळी प्राप्त करून देण्यासाठी अनेक योजनांचा अंतर्भाव केला. योजनांद्वारे ही सर्व स्थळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचे नियोजन केले. या योजनांची घोषणा पूर्वीच झाली असताना जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी 2016-17 या वर्षासाठी 12 कोटींची मागणी केली होती. त्यातील फक्त दीड कोटीचा निधी मिळाला आहे.

नागपूर विकास पॅकेजअंतर्गत काटोल येथील जाम नदी प्रकल्प येथील विकासकामासाठी 2 कोटी 74 लाखांचा अंदाजित खर्च होता. त्यातील फक्त 40 लाख रुपये मंजूर झाले. श्रीसती अनसूया माता संस्थान पारडसिंगा विकासासाठी 50 लाखांपैकी फक्त 25 लाख, कामठी तालुक्‍यातील घोरपड येथील तलावाचे सौंदर्यीकरण व जलतरण क्रीडा केंद्रासाठी 2 कोटी 73 लाखांपैकी 30 लाख, कामठी तालुक्‍यातील धानला येथे तलावाचे सौंदर्यीकरण व जलतरण क्रीडा केंद्र याचा विकासासाठी तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. त्यातील फक्त 30 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे या प्रकल्पाचे कामास प्रारंभ होईल. मात्र, पूर्णत्वाकडे नेण्यासाठी निधीची गरज भासणार आहे.

Web Title: 1.5 crore for tourism development