नऊ महिन्यांत अडकले २२ लाचखोर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

भंडारा - भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सजग होऊन काम करीत आहे. तरीही भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल २२ जणांच्या मुसक्‍या आवळल्या. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात चार कारवाया करून पाच जणांना गजाआड केले. एकूण १५ प्रकरणात २२ लाचखोरांना पकडले.

भंडारा - भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सजग होऊन काम करीत आहे. तरीही भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल २२ जणांच्या मुसक्‍या आवळल्या. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात चार कारवाया करून पाच जणांना गजाआड केले. एकूण १५ प्रकरणात २२ लाचखोरांना पकडले.

जानेवारीत भंडारा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार अमोल तुळजेवार याच्यावर दीड लाख लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. २५ जानेवारीला सेंदूरवाफा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य केशव निपाणे याला ४ हजार पाचशे रुपये, ६ फेब्रुवारीला तुमसर येथे ईश्‍वरराव देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूरचे प्रा. राजेंद्र डहाळे आणि साकेत  शारीरिक शिक्षण महाविद्यालय गोंदिया येथील प्रा. हितेश राठोड याला ३० हजार रुपये, १५ मार्चला तुमसर रोड देव्हाडी येथील रेल्वे सुरक्षा दल जवानाला १५ हजार, २७ एप्रिलला वनकार्यालय अड्याळ येथील वनसंरक्षक रवी दहेकर याला १ हजार, ३ मे रोजी साकोली पंचायत समितीअंतर्गत पिटेझरी जि. प. प्राथमिक शाळा पिटेझरी येथील शिक्षक रमेश दुपारे याला १ हजार ५०० रुपये, १३ मे रोजी इंदोरा वाहतूक पोलिस प्रकाश राठोड याला १ हजार ५०० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. २० जूनला लाखांदूर तालुकाअंतर्गत बेलाटी येथील चक्रधर स्वामी शिक्षण संस्था सचिव निश्‍चय दोनाडकर, अध्यक्ष दीपक दोनाडकर आणि मोहरणा येथील सदानंद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक केवळराम आकरे या तिघांना संयुक्तपणे ८० हजार रुपये, २४ जूनला सिहोरा येथील महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील सहायक शिक्षक सतीश बरडे याला १ हजार २०० रुपये घेताना पकडण्यात आले.

२६ जुलै रोजी पवनी  तालुक्‍यात सापळा रचण्यात आला. यात वलनीच्या संतोष गांडले, तहसील कार्यालयाचा कनिष्ठ लिपिक जयसिंग रावते आणि भंडारा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई ज्ञानेश्‍वर होके, मिलिंद कंधारे या चौघांना २ हजार ५०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. ऑगस्ट महिन्यात साकोली येथील सहायक निबंधक बुरडे, कनिष्ठ लिपिक बहेकार यांना पाच हजार रुपये घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पवनी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली. भंडारा येथे १९ ऑगस्टला पोलिस नायक अशोक सरादे याला सात हजारांची लाच घेताना पकडले. २९ ऑगस्टला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रवींद्र चव्हाण यांना ५ हजारांची लाच घेताना गजाआड केले.