वर्षभरात रस्ते अपघातात 268 जणांचा मृत्यू

वर्षभरात रस्ते अपघातात 268 जणांचा मृत्यू


नागपूर - शहरात दिवसेंदिवस प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात वाहन चालविताना झालेल्या चुकांमुळे घडलेल्या अपघातांत 268 जणांना प्राण गमवावा लागला. यात 1,355 जण जखमीही झाले. रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये भरधाव दुचाकी चालवून मरण पावणाऱ्यांचा आकडा 92 इतका आहे. वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केल्यास अपघातांवर नियंत्रण आणणे शक्‍य आहे.

शहरातील रॅश ड्रायव्हिंग आणि बाइकर्सची धूम नेहमीचीच आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतोच, तसेच अन्य वाहनचालकांनाही होतो. शहरात वाहतूक पोलिसांवर मरगळ आल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे. वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे किंवा दुर्लक्षित धोरणामुळे धूमस्टाइल बाइक चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. स्टाइल मारण्याच्या नादात अपघात होऊन काही युवकांना जीव गमवावा लागला. शहरातील अनेक रस्त्यांवर धूम स्टाइलने दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या आहे. यामध्ये सेमिनरी हिल्स, फुटाळा तलाव मार्ग, अंबाझरी बगीचा मार्ग, वाडी रोड इत्यादी मार्गांवर नेहमीच धूम बाइकर्स स्टंटबाजी करताना दिसतात. स्टंटबाजीवर पोलिस कारवाई करीत नसल्यामुळे युवावर्ग ही बाब हेरून मुलींसमोर स्टंटबाजी करताना दिसतात. अशावेळी वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे युवकांचे चांगलेच फावते. यासोबतच मद्यप्राशन करून दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र, पोलिसांच्या खाऊ धोरणामुळे ही संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याला जबाबदार केवळ पोलिसांचा नाकर्तेपणा आहे. वाहतूक पोलिसांनी चिरीमिरी न घेता सरळ दंडाची पावती फाडून वाहन जप्त केल्यास मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसू शकतो. मात्र, त्यातून होणारी "कमाई' बुडणार, या भीतीने पोलिस केवळ कारवाईचा फार्स दाखवून लुबाडणूक करतात.

29 हजार 500 चालकांनी केला "सिग्नल जम्प'
शहरातील वाहतूक पोलिस चौकात राहण्यापेक्षा रस्त्यावरील झाडाखाली उभे राहण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे शहरात रोज हजारो वाहनचालक सिग्नल जम्प करतात. यावर्षी पोलिसांनी 29 हजार 527 जणांवर सिग्नल जम्पिंगचा गुन्हा दाखल केला. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात वाहनचालक सिग्नल जम्पिंग करताना दिसतात.

वेगावर "ब्रेक' नाही
वाहतूक पोलिसांनी धूम स्टाइल वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अभियान राबविले नाही. त्यामुळे वर्षभरात केवळ 1,687 वाहनांवर कारवाई केल्या गेली. 2015 मध्ये तीन हजार 100 वाहनचालकांवर कारवाई केल्या गेली होती. त्यामुळे यावर्षी भरधाव दुचाकी चालविणाऱ्यांवर "ब्रेक' लावण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मोबाईलवर बोलणाऱ्यांवर लावा लगाम
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र वर्षभरात केवळ 5 हजार 900 वाहनचालकांवर कारवाई केल्या गेली. 2015 मध्ये तब्बल 11 हजार 800 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. यावर्षी मोबाईलवर बोलणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई थंडावली होती. त्यामुळे यावर्षी मोबाईलवर बोलणाऱ्यांवर लगाम कसण्यावर भर देणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया....
पोलिसांनी गांभीर्य दाखवावे
शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. वाहतूक पोलिसांनी गांभीर्य दाखविल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था ताळ्यावर येऊ शकते. तसेच वाहनचालकांनीसुद्धा नैतिक जबाबदारी सांभाळून वाहन चालवावे.
- बळीराम फुलारी, माजी सहायक पोलिस आयुक्‍त

अतिआत्मविश्‍वास नडतो
बाइक चालविताना अतिआत्मविश्‍वास दाखविल्यामुळे अनेकदा अपघात होतात. यामध्ये चालकाला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे दुचाकी चालविताना भान ठेवावे. तसेच पोलिसांनीसुद्धा रॅश ड्रायव्हिंगवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
- प्रमोद ठाकरे (शिक्षक)

आम्हीच जबाबदार का?
अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकीची चावी देताना पालकांनी विचार करावा. मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? त्याला नीट दुचाकी चालविता येते का? याचा विचार पालकांनी करावा. त्यानंतर दुचाकी मुलाच्या हातात द्यावी. रस्ते अपघात घडल्यास केवळ पोलिसांनाच दोषी धरले जाते. मात्र, वाहनचालकांच्या चुकांकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. भरडल्या जातो तो केवळ पोलिस.
- एक वाहतूक पोलिस कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com