उत्तराखंडमध्ये अकाेला जिल्ह्यातील ३०० भाविक सुरक्षित

सुगत खाडे 
शनिवार, 20 मे 2017

भूस्खलनाच्या ठिकाणापासून जिल्ह्यातील भाविक दूर असल्यामुळे त्यांना काेणत्याच प्रकारचा धाेका नसल्याची माहिती एका भाविकाने ‘सकाळ’शी बाेलतांना दिली आहे.

अकाेला- उत्तराखंडमध्ये अकाेला जिल्ह्याचे २५० पेक्षा जास्त भाविक सुखरूप आणि सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भूस्खलनाच्या ठिकाणापासून जिल्ह्यातील भाविक दूर असल्यामुळे त्यांना काेणत्याच प्रकारचा धाेका नसल्याची माहिती एका भाविकाने ‘सकाळ’शी बाेलतांना दिली आहे.

चारधाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. यात्रेच्या वेळेत उत्तराखंडच्या बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी (ता. १९) भूस्खलन झाल्याने १५ हजार भाविक अडकले होते. चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून नऊ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यासोबतच हृषिकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावरील ६० मीटर भागाचे भूस्खलनामुळे नुकसान झाले आहे. मात्र भूस्खलनामुळे अकाेला जिल्ह्यातून गेलेल्या २५० पेक्षा अधिक भाविकाला काेणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील शिवाजी नगर परिसरातील राज राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने चारधाम साठी यात्रेचे आयाेजन करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील १४० महिला व ११० पुरूष पाच लक्झरी बस व एक छाेटी कार घेवून १५ मे राेजी यात्रेसाठी रवाना झाले.

यात्रेच्या सुरुवातीला भाविकांनी आेंकारेश्वर, वृंदावन व मथुऱ्यामध्ये दर्शन घेतले. त्यानंतर पुढील यात्रेला सुरुवात केली. उत्तराखंडच्या तिहरी गडवाला जिल्ह्यातील शिशम घाडी शहरातून संबंधित भाविक शनिवारी (ता. २०) सकाळी सहा वाजता चारधाम यात्रेसाठी जाणार हाेते. परंतु त्यांच्या यात्रेला सुरूवात हाेण्या आधीच भूस्खलन झाल्यामुळे ते शिशम घाडी शहरातील स्वामिनारायण धर्मशाळेत सुखरुप मुक्कामी आहेत. अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ता व चारधाम यात्रेला गेलेल्या बाळकृष्ण बिडवई यांनी उत्तराखंडवरून ‘सकाळ’शी बाेलतांना दिली. याव्यतिरीक्त जिल्ह्यातील रहिवाशी दिपक गायकवाड हे त्यांच्या मालकीच्या गाडी क्रमांक एमएच-३०-एए-९०९१ ने उत्तराखंड येथे पर्यटनाकरीता भाविक घेऊन गेले आहेत. परंतु भूस्खलन झाल्यामुळे ते हरिव्दार येथे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन
उत्तराखंड येथे बद्रीनाथजवळ विष्णुप्रयाग येथे भूसस्खलन झाल्यामुळे जिल्ह्यातील काही भाविक उत्तराखंड परिसरात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ पर्यटकांचे नाव, दुरध्वनी क्रमांक, गाव, शहराचे नाव याबाबत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२४-२४२४४४४, २४३५००७, १०७७ वर देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.