कारमधून सव्वातीन कोटींची रोख जप्त

Money-Seized
Money-Seized

नागपूर - नंदनवन पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री प्रजापती चौक परिसरात डस्टर कार रोखून सव्वातीन कोटींची रोख हस्तगत केली. रायपूरच्या सराफा व्यापाऱ्याने नागपुरातील व्यावसायिकाला देण्यासाठी ही रक्कम पाठविल्याचा दावा केला जात असला तरी ही रोख  हवालाची असल्याचा संशय आहे.

राजेश वामनराव मेंढे (४०) रा. मिनिमातानगर आणि नवनीत जैन (२९) रा. तुळशीनगर,  शांतीनगर अशी ताब्यातील आरोपींची नावे आहेत. रायपूरहून नागपुरात पैशांची मोठी खेप एमएच ३१- एफए ४६११ क्रमांकाच्या वाहनातून येत असल्याची गुप्त माहिती नंदनवन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री पाळत वाढविण्यात आली. प्रजापती चौकात सापळा रचण्यात आला.

कार दिसताच पोलिसांनी पाठलाग करीत चालकाला कार थांबविण्यास बाध्य केले. राजेश आणि नवनीतची चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तरे देत नव्हते. पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी कार घेऊन वर्धमाननगरातील केसानी नावाच्या व्यापाऱ्याकडे जात असल्याचे सांगितले. त्यांच्याकडूनच मोबाईल क्रमांक घेऊन पोलिसांनी केसानीला फोन केला. त्याला नंदनवन ठाण्यात हजर होण्याची सूचना दिली. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

रविवारी सकाळी पंचासमक्ष कुलूप उघडताच मोठ्या प्रमाणावर नोटांची बंडले दिसल्याने  पोलिसांचे डोळेच विस्फारले. 

नोटांची संख्या फार अधिक असल्याने नोटा मोजण्याचे मशीन बोलावून घेण्यात आले. पंचांसमोर नोटा मोजण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले. एकूण ३ कोटी १८ लाख ७ हजार २०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

रायपूरच्‍या व्‍यापाऱ्याची रक्‍कम?
कारमधून जप्त करण्यात आलेली रक्कम रायपूर येथील मॅपल ज्वेलरीचे संचालक ठक्कर यांनी नागपुरातील व्यापाऱ्याला देण्यासाठी पाठविल्याची माहिती पुढे आल्याचे तसेच मॅपल कंपनीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार होत असल्याचे सांगण्यात येते. मोठी रक्कम असूनही त्यावर हक्क दाखविणारे कुणीही ठाण्यात पोहोचले नसल्याने हे हवालाचेच पैसे असावे ही शंका अधिक गडद झाली आहे. पोलिससुद्धा हवालाचीच रक्कम असल्याचे गृहीत धरून चौकशी करीत आहेत. 

आयकर विभागाकडून चौकशी
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नीलेश भरणे ठाण्यात हजर झाले. कोट्यवधींची रोख असल्याने भरणे यांनी तत्काळ आयकर विभाग आणि सक्तअंमलबजावणी संचालनालयाला  माहिती देत अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पोलिस व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रकमेसंदर्भात आवश्‍यक कागदपत्रे सादर करण्याची ताकीद व्यापाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.

डिकीत, सीटखाली लॉकर
कारची बारकाईने तपासणी केली असता डिक्की आणि चारही सीटखाली वैशिष्टपूर्ण लॉकर कुलूपबंद अवस्थेत दिसले. संशय बळावल्याने पोलिसांनी चालकाकडे चावीची मागणी केली. त्याने चाव्या मालकाकडेच असल्याचे सांगितले. पोलिसांच्या तगाद्यामुळे केसानीतर्फे मनीष खंडेलवाल ठाण्यात हजर झाला. सकाळी ७ वाजता त्याने लॉकरची चावी उपलब्ध करून दिली. त्यानंतरच लॉकर उघडून रक्कम बाहेर काढण्यात आली.

नोटांच्या बंडलांची संख्या
बंडल                    एकूण              मूल्य 

२०००च्या नोटा       १०९                  २ कोटी १८ लाख
५००च्या नोटा            १५२                ७६ लाख
२००च्या नोटा            २४                  ४ लाख ८० हजार
१०० च्या नोटा          १९२+ ७२        १९ लाख २७ हजार २००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com