जन्मदिनी गडकरी यांना ६१ लाखांची भेट - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्मदिन साधेपणाने साजरा केला जाणार असून, त्यांना पक्षाच्या वतीने ६१ लाख रुपयांची भेट दिली जाणार आहे. याकरिता प्रत्येकाने आर्थिक मदत करावी, असे अवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्मदिन साधेपणाने साजरा केला जाणार असून, त्यांना पक्षाच्या वतीने ६१ लाख रुपयांची भेट दिली जाणार आहे. याकरिता प्रत्येकाने आर्थिक मदत करावी, असे अवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

भाजपच्या विदर्भ पदाधिकारी आणि आमदारांची बैठक रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवन येथील सभागृहात झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसासोबतच पक्ष संघटन मजबूत आणि विस्तारावर चर्चा झाली. व्यासपीठावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, आमदार चैनसुख संचेती, रामदास आंबटकर, उपेंद्र कोठेकर, रवींद्र  भुसारी, हरी जावडे होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पक्षाचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने गतीनेच काम करायला हवे. जे या गतीत राहणार नाही. त्यांना बाहेर जावे लागेल. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदयचा विचार दिला. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षांनी कार्यक्रम दिला आहे.  २६ ते ३० मेदरम्यान प्रत्येक गावात संवाद शिवार कार्यक्रम घ्यायचा आहे. या कामात सहभागी होणाराच खरा कार्यकर्ता समजला जाणार आहे. कुणी किती आणि कशा प्रकारे काम केले, याचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कस्तुरचंद पार्कला होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, खासदार शरद पवार, मात्री मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, श्री श्री रविशंकर यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रत्येक आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद व नगर परिषद अध्यक्षांनी एक-एक हजार कार्यकर्ते आणण्यासोबत एक-एक लाख रुपये देण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.

स्वबळावर सत्ता हवी - आंबटकर
विदर्भासहित राज्याच्या प्रत्येक घरात पक्ष पोहोचला पाहिजे, या दृष्टिकोनातून काम करायचे आहे. येणाऱ्या काळात स्वबळावर सत्ता स्थापित झाली पाहिजे, असे आवाहन प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर यांनी केले. निवडणुकीच्या काळात काही दुखावल्यामुळे बूथ तुटले. हे बूथ नव्याने बांधणी करा. सरकारी योजनांची माहिती प्रत्येक घरात आणि महिलांपर्यंत पोहोचवा,  अशाही सूचना त्यांनी केल्या.