96 लाख 26 हजार 121 किलो कॉंक्रिट रस्त्यावर! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नागपूर - जवळपास चाळीस तासांमध्ये छत्रपती चौकातील उड्डाणपुलावरील चार हजार क्‍युबिक मीटर (96 लाख 26 हजार 121 किलो कॉंक्रिट) एवढे बांधकाम पाडण्यात आले. पूल तोडण्याचे काम अतिशय वेगाने सुरू असून, आता चौकात केवळ पिलर उरले आहेत. रात्री उशिरापर्यंत मलबा हटविण्याचे काम सुरू होते. 

नागपूर - जवळपास चाळीस तासांमध्ये छत्रपती चौकातील उड्डाणपुलावरील चार हजार क्‍युबिक मीटर (96 लाख 26 हजार 121 किलो कॉंक्रिट) एवढे बांधकाम पाडण्यात आले. पूल तोडण्याचे काम अतिशय वेगाने सुरू असून, आता चौकात केवळ पिलर उरले आहेत. रात्री उशिरापर्यंत मलबा हटविण्याचे काम सुरू होते. 

छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडण्याचे काम पंधरा दिवसांच्या आत पूर्ण होणार असल्याचा दावा मेट्रोने आधीच केलेला आहे. परंतु, त्यापूर्वीच काम आटोपते घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या ठिकाणी भेट दिली. नितीन गडकरी यांनी "वेल मॅनेज्ड वर्क' असा रिमार्क देऊन मेट्रो व्यवस्थापनाचे कौतुक केले. दरम्यान, छत्रपती चौकातील दोन मोठे स्पॅम मध्यरात्रीपर्यंत खाली पाडण्यात आले. भल्या मोठ्या क्रशरने चुरा करून मलबा काढण्याचे काम सुरू आहे. मुख्य म्हणजे पूल तोडण्याचे काम नागपूरकर एखाद्या "इव्हेंट'प्रमाणे साजरे करीत आहेत. काहींना पुलाच्या आठवणीचे उमाळे दाटून येत होते, तर काही सेल्फी घेण्यात व्यस्त होते. सलग दुसऱ्या दिवशी तुटलेल्या पुलासोबत सेल्फी काढणारे तरुण बघायला मिळाले. नागपुरातील चित्रकारांनी चौकाच्या वेगवेगळ्या बाजूला बसून तुटलेला पूल कॅनव्हासवर साकारला. एखाद्या पुलाशी त्या भागातील नागरिकांचे आयुष्य कसे जुळलेले असते, याची भावनिक किनार या चित्रांमध्ये उमटविण्याचा प्रयत्न चित्रकार करीत होते. मेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी दुपारीच कामाचे निरीक्षण केले. चित्रकारांशीही त्यांनी संवाद साधत त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले. 1997 मध्ये बांधण्यात आलेला हा पूल अत्यंत मजबूत असल्यामुळे यातील कॉंक्रिट सहजासहजी तुटणारे नाही. परंतु, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे मुदतीच्या आत काम पूर्ण होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. 

अधिवेशनापूर्वी वाहतूक सुरळीत 
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाच डिसेंबरपासून नागपुरात आहे. आदल्या दिवशीच मंत्रिमंडळ आणि राज्यभरातील आमदार नागपुरात असतील. त्यामुळे विमानतळावरून शहराकडे येणाऱ्या वर्धा मार्गावर वाहतुकीची वर्दळ असेल. अशात संपूर्ण पूल तोडल्यानंतरही रस्ता मोकळा होईल की नाही, अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु, अधिवेशनाच्या पाच दिवस आधीच रस्ता मोकळा झालेला असेल आणि वाहतूकही सुरळीत असेल, असा विश्‍वास मेट्रो कंपनीने व्यक्त केला आहे. 

प्रत्येक कामाचे नियोजन वेळेनुसार केले आहे. त्यामुळे पंधरा दिवसांचा कालावधी सांगितला असला तरी त्यापूर्वीच काम संपलेले असेल. 
- शिरीष आपटे, उपमहाव्यवस्थापक  जनसंपर्क विभाग, मेट्रो कंपनी