राष्ट्रीय पुरस्कारासाठी "आदर्श' नियमावली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

शिक्षकांमध्ये असंतोष : कोऱ्या कागदावर घेतल्या स्वाक्षऱ्या

शिक्षकांमध्ये असंतोष : कोऱ्या कागदावर घेतल्या स्वाक्षऱ्या
नागपूर - शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी नागपूर विभागातील निवड समितीने स्वतंत्र आदर्श नियमावली निर्माण केली आहे. कागदपत्रांची पडताळणी करायची नाही, मुलाखती घेऊन प्रत्यक्षकार्य तपासायचे नाही आणि कोऱ्या कागदावर शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन स्वतःच गुणदान करायची, अशी ही पद्धत यंदापासून अमलात आणली आहे. त्यामुळे चांगल्या शिक्षकांवर अन्याय झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे.

राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाच जणांची विभागीय निवड समिती असते. त्यात प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तसेच दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि शिक्षण उपसंचालक यांचा समावेश असतो. यावर्षी राष्ट्रीय व राज्य पुरस्कासाठी 16 एप्रिलला ऑनलाइन अर्ज करण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. सात मे रोजी रविवार असताना अर्ज केलेल्या शिक्षकांना मुलाखतीस बोलावण्यात आले. ऑनलाइन अर्जासोबत सर्व दस्तावेज जोडले असताना पुन्हा संबंधित शिक्षकांकडून त्याच्या झेरॉक्‍स घेण्यात आल्या. नंतर कोऱ्या कागदावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर बुद्धपौर्णिमेची सुटी असताना 10 मे रोजी पुन्हा सर्व शिक्षकांना बोलावण्यात आले. खोडतोड झाली असल्याचे सांगून पुन्हा कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. निवड समितीने स्वतः गुणदान केले. अशा पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी नागपूर विभागातून अर्ज पाठविण्यात आले. ते ग्राह्य धरून पुरस्कारही घोषित झाले आहेत.

वरघने सरांना बसला धक्का
लिकेच्या पन्नालाल देवडिया हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक मोरेश्‍वर वरघने यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चांगलाच धक्का बसला. वरघने यांनी स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी केले. त्यांच्या पॅटर्न संपूर्ण राज्याने स्वीकारला. एवढेच नव्हे त्यांच्या अभिनव व विविध उपक्रमांमुळे शाळेला आयएसओ सर्टिफिकेटसुद्धा प्राप्त झाले आहे. वाचाल तर वाचाल, कौशल्यावर आधारित ज्ञानरचना उपक्रम राबविले. विशेष पुरस्कारासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक असलेल्या विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि शंभर टक्के उपस्थिती यातही वरघने सरांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वतः दीडतास पन्नालाल शाळेत त्यांचे उपक्रम जाणून घेण्यासाठी थांबले होते. माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनीसुद्धा त्यांना शाब्बासकीचे प्रशस्तिपत्र दिले होते. मात्र, त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारासाठी साधा विचारही करण्यात आला नाही. विशेष म्हणजे मागील वर्षी वरघने सरांचा राष्ट्रीय पुरस्कार थोडक्‍यात हुकला होता. पुरस्काराच्या यादीत त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. यंदा पहिल्या दहामध्येसुद्धा त्यांच्या नावाचा समावेश नाही. याची लेखी तक्रार शिक्षण उपसंचालक यांच्याकडे त्यांनी केली असून निवड समितीच्या गुणदानावरच प्रश्‍न उपस्थित केला आहे.

Web Title: aadarsh rules for national award