"आयुष्यमान भारत'चे पोर्टलच नाही तयार

File photo
File photo

"आयुष्यमान भारत'चे पोर्टलच नाही तयार
नागपूर : केंद्र सरकारच्या "आयुष्यमान भारत' योजनेचे लोकार्पण उपराजधानीसह देशभरात 23 सप्टेंबरला झाले. मात्र, उपराजधानीतील सुपर स्पेशालिटी, मेयो, मेडिकलमध्ये योजनेचे पोर्टलच तयार झाले नाही. कोणतेही फलक न लावल्याने उपचारासंदर्भात डॉक्‍टरांनी चुप्पी साधली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने चंद्रपुरात तीन रुग्ण या योजनेचे लाभार्थी ठरल्याचा दावा केला आहे.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मंगळवारपासून (ता. 25) उपचार सुरू होतील, असे सांगण्यात आले. मात्र, उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या केंद्रांवर या योजनेच्या उपचाराची माहिती कोणत्याही डॉक्‍टरला नाही. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षातून एकदा पाच लाख रुपये विमा संरक्षण उपचारासाठी मिळणार आहे. कोणत्याही आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीला उपचार घेता येतील.
2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक तसेच जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार केली. ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशा कुटुंबाचा समावेश या योजनेत आहे. विमा काढलेल्या कुटुंबातीलच पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना मेडिकल, मेयो, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयासह आरोग्य विभागाच्या रुग्णालयात सुरू झाल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. परंतु, मंगळवारी एकाही रुग्णाची नोंद या योजनेअंतर्गत मेडिकल, मेयो व सुपरस्पेशालिटीत झाली नाही.
तांत्रिक विभागाकडून दुरुस्तीचे काम
"आयुष्यमान भारत' योजनेत नागपूर शहरातील दोन लाख 398 तर नागपूर ग्रामीणच्या एक लाख 76 हजार 903 असे एकूण तीन लाख 77 हजार 301 पात्र कुटुंबीयांचा समावेश आहे, असे लोकार्पण सोहळ्यातून सांगण्यात आले होते. मात्र, रुग्णांच्या नोंदीची सोय नसल्यानेच उपचार झाले नसून तांत्रिक विभागाकडून दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू झाले आहे. लवकरच पोर्टल तयार होतील, असेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com