अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

नागपूर - नागपूरसमवेत राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, ज्या शिक्षकांना काही महिन्यांपासून अतिरिक्त करण्यात आले, त्यांना तीन महिन्यांपासून पगार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

नागपूर - नागपूरसमवेत राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, ज्या शिक्षकांना काही महिन्यांपासून अतिरिक्त करण्यात आले, त्यांना तीन महिन्यांपासून पगार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

जिल्ह्यात २०१५-१६ दरम्यान अतिरिक्‍त शिक्षकांच्या पदभरतीची प्रक्रिया पार पडली. मात्र, त्यानंतर शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले. यात नागपूर जिल्ह्यातील आठशे शिक्षकांचा समावेश होता. या शिक्षकांचा ‘नो वर्क नो पे’ तत्त्वावर पगार बंद करण्यात आला. यानंतर शासनाने समायोजनाची प्रक्रिया राबविली. तसेच लवकरात-लवकर समायोजन करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. मात्र, यात बऱ्याच प्रमाणात घोळ झाल्याचे दिसून आले. दरम्यान, ज्या शिक्षकांचे समायोजन करण्यात आले, त्यांना शाळांमध्ये रुजू करण्यास नकार दर्शविला. आता ज्या शिक्षकांना रुजू केले, त्यांचा डाटा ऑनलाइन टाकण्यात न आल्याने या शिक्षकांचे पगार थांबवून ठेवले आहेत. शिवाय, ज्या शिक्षकांचे समायोजन झालेले नाही, त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सर्व शिक्षक संघटनांनीही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन सादर केले. मात्र, त्यानंतरही अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याने अतिरिक्त शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे.

शासन यासंदर्भात सकारात्मक आहे. लवकरच अतिरिक्त शिक्षकांच्या पगारासंदर्भातील निर्णय होईल. निर्णय होताच शिक्षकांचे पगार होतील. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. 
- अनिल पारधी, शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग