चाळिशीनंतर दरवर्षी एक टक्का मेंदूची झीज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

नागपूर - सामान्यपणे माणसाच्या मेंदूचा आकार १.१ लिटर क्षमतेचा असतो. वयोमानानुसार शरीराच्या अवयवांची झीज होते. त्याला मेंदूही अपवाद नाही. वयाच्या चाळिशीनंतर मेंदूची झीज होणे सुरू होते. दरवर्षी एक टक्का झीज होते. रक्तदाबामुळे मेंदू आकुंचन पावतो. अनियंत्रित रक्तदाबामुळे दगावणाऱ्या १०० जणांपैकी १५ टक्के व्यक्तींची किडनी निकामी होते, अशी माहिती ज्येष्ठ किडनीविकारतज्ज्ञ डॉ. अशोक कृपलानी यांनी काल (ता. १५) दिली. 

इंडियन अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून विविध आजारांवर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. कृपलानी यांनी चोर पावलांनी येणाऱ्या रक्तदाबावर प्रकाश टाकला. अनियंत्रित रक्तदाबामुळे आकस्मिक हृदयक्रिया बंद पडते. मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्याने मेंदूचा पक्षघात (ब्रेनस्ट्रोक) होतो. रक्तदाब दिवसभर सारखा नसतो. कमी-अधिक तर कधी सामान्य होतो. ७० टक्‍के रुग्णांना सकाळी पाच ते सहा या वेळेत हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. एकूण लोकसंख्येच्या सरासरी दोन टक्‍के लोकसंख्या अकस्मात रक्तदाब वाढल्याने दगावते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनातून समोर आले आहे. उच्च रक्तदाब मृत्यूचे मोठे कारण आहे. त्यापाठोपाठ तंबाखू, मधुमेह, व्यायामाचा अभाव, असुरक्षित शारीरिक संबंध, मद्यपानामुळे जगभरातील नागरिक अकाली दगावतात, असे कृपलानी यांनी सांगितले. 

दोन प्रकारांतील ‘रक्तदाब’
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार हृदयविकाराचा झटका ‘व्हाइट’ आणि ‘मास्क्‍ड’ कोट अशा दोन प्रकारांत मोजला जातो. दिवसभरात रक्तदाब कमी-अधिक होत राहतो. परंतु, ‘व्हाइट कोट’ प्रकारातील रक्तदाब दिवसभरात कार्यालयात वाढतो. घरी सामान्य असतो. परंतु मास्क्‍ड कोटमधील रक्तदाब दिनचर्येच्या वेळी सामान्य असतो. रात्रीच्या वेळी या रक्तदाबाची जोखीम अधिक असते, असे डॉ. अशोक कृपलानी यांनी सांगितले.