अजनी-नांदेड विशेष ट्रेन रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

प्रवासीच मिळत नसल्याने घेतला रेल्वे प्रशासनाने निर्णय

नागपूर - प्रवासीच मिळत नसल्याने अजनी-नांदेड-अजनी दरम्यान प्रस्तावित विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. प्रवाशांच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मिळणारी एक अतिरिक्‍त ट्रेन नागपूरने गमावली आहे. पण, जनतेपर्यंत या ट्रेनबाबत माहिती पोहोचविण्यात प्रशासनच अपयशी ठरल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

नांदेड येथील शीख धर्मीयांच्या धर्मस्थळाला सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जातात. याशिवायही नांदेड मार्गावर प्रवाशांची गर्दी असते. उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईत या मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अजनी-नांदेड-अजनी दरम्यान ०७६३०/०७६२९ विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय  घेतला होता. त्यानुसार अजनीवरून नांदेडसाठी २८ मार्च आणि ४ एप्रिलला विशेष ट्रेन चालविण्यात आली. या दोन्ही वेळा या विशेष फेऱ्यांकडे प्रवाशांनी पाठ फिरविली. २८ मार्चला रवाना झालेल्या गाडीत स्लीपरच्या ४३२ पैकी केवळ ७२ सीट प्रवाशांनी बूक केल्या होत्या. तर, वातानुकूलित (थर्ड एसी) डब्यात १२८ सीटपैकी केवळ २८ सीट बुक होत्या. ४ एप्रिलच्या प्रवासात तर प्रवासीसंख्या आणखीच घटली. स्लीपरच्या डब्यातील एकूण सीटपैकी केवळ ७४ बर्थवरूनच प्रवाशांनी प्रवास केला. तर, वातानुकूलित डब्यातील केवळ २४ बर्थ प्रवाशांनी बुक केले होते. 

रेल्वेच्या नियोजित वेळापत्रकानुसार अजनी-नांदेड-अजनी विशेष ट्रेनच्या १५ फेऱ्या प्रस्तावित होत्या. पण, पूअर ऑक्‍युपंसीचे कारण पुढे करून ही ट्रेन दोनच फेऱ्यांनंतर रद्द करण्यात आली असल्याची माहिती आहे. नंदीग्राम एक्‍स्प्रेसला पर्याय असलेल्या या गाडीला योग्यप्रमाणात प्रवासी मिळाले असते तर अजनीवरून सुटणाऱ्या गाडीत नक्‍कीच भर पडली असती. पण, प्रशासनाने या गाडीच्या फेऱ्यांबाबत योग्य प्रसिद्धी न दिल्याने नागपूरकरांची मोठी निराशा झाली.

असे होते नियोजन
नियोजनानुसार ०७६२९ नांदेड-अजनी विशेष ट्रेन ३, १०, १७, २४ एप्रिल, १, ८, १५, २२, २९ मे आणि ५, १२, १९, २६ जून दरम्यान एकूण १२ फेऱ्या प्रस्तावित होत्या. तर गाडी क्रमांक ०७६३० अजनी-नांदेड ट्रेनच्या ११, १८, २५ एप्रिल, २, ९, १६, २३, ३० एप्रिल आणि ६, १३, २०, २७ जून दरम्यान १२ फेऱ्या प्रस्तावित होत्या.