स्पर्धा परीक्षेतून मुख्याधापकांची वर्णी

विवेक मेतकर
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

खासगी शिक्षण संस्थांवर लागणार अंकुश, आणखी एक नविन नियम लागू होण्याची शक्यता

अकोला : शिक्षण क्षेत्र आपल्या विविध बदलासाठी नेहमीच चर्चेत असते. शिक्षक भारतीसाठी आधीच टीईटी ही पात्रता परीक्षा सक्तीची केली आहे. परंतु, शासन आता खासगी संस्था चालकांवर आणखी एक प्रहार करीत असून आता खासगी माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकही स्पर्धा परीक्षेतून निवडण्याबाबत शासन विचार करीत आहे. परिणामी भविष्यात संस्था चालकांना आपल्या मर्जीतल्या अथवा नातेवाईक मुख्याध्यापक करण्यावर मर्यादा येणार आहेत.

सन २००९ पासून शासन शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे बदल करत शिक्षण हक्क कायदा, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शाळांचे नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तसेच शिक्षक संच मान्यता विद्यार्थी संख्येवर तसेच सध्या चर्चेत असणारा विषय म्हणजे शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीसाठी विशिष्ट अटींची पूर्तता आदी गोष्टींचा यात समावेश आहे. सध्या यात आणखी एका नव्या निर्णयाची भर पडणार असून भविष्यात मुख्याध्यापकांच्या निवडी या स्पर्धा परीक्षेमधून करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे.

खासगी संस्थाचालकांच्या मनमानीस चाप देत असताना आता शाळांचे कार्यालयीन प्रमुख असणाऱ्या मुख्याध्यापकांच्या निवडी आता स्पर्धा परीक्षेमधून करण्यात येणार आहेत. सर्व कर्मऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा मुख्याध्यापक हा साधारणतः संस्था चालकांचा नातलग अथवा सगा-सोयरा निवडला जात असे. परंतु, खासगी संस्थाचालकांच्या या अधिकारावर आता गदा येणार आहे. शासनाने सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापकांच्या जागांचा अहवाल तयार केला असून भविष्यात मुख्याध्यापक निवड करण्यासाठी बीएड व पदवीधर शिक्षण घेतलेली व्यक्ती व त्यास पाच वर्षे अध्यापनाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीकडून अर्ज घेऊन त्यांची स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा घेऊन मुख्याध्यापक निवड करण्यात येणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :