दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे द्यावे- अकोल्यातील शेतकर्‍यांचे साकडे

अनिल दांडी
मंगळवार, 27 जून 2017

शासनाने आर्थीक मदत करून शेतकर्‍यांची बाजू बळकट करावी, किंवा बियाणे मोफत द्यावे अशा मागणीचे निवेदनासह शेतकर्‍यांनी तहसिलदार दिपक पुंडे यांना साकडे घातले आहे.

बाळापूर : पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवण्यापुर्वीच वन्यप्राण्यांकडून नासधुस करण्यात आली असून शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे खुप मोठे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मोफत बियाणे किंवा आर्थीक सहाय्य करण्यात यावे या मागणीसाठी बाळापूर तालुक्यातील शेतकर्‍यांसह शिवसेनेचे पदाधीकारी तहसिल कार्यालयावर आज मंगळवारी धडकले.

तालुक्यातील खंडाळा, निमकर्दा, टाकळी शेतशिवारात हरीण व रानडुकरांच्या कळपाने पेरणी केलेले बियाणे उकरून पन्नास ते साठ एकराची नासधुस करुन  बियाणे उगवण्यापुर्वीच उकरून फस्त केले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍याचे नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

दुबार पेरणीसाठी आर्थीक परीस्थीती कमकुवत असल्याने खुप मोठे संकट शेतकर्‍यांसमोर उभे आहे. शेतशिवारात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सोयाबीन, तुर, मुग व कपाशीची पेरणी केली होती.मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली.जमीनीतून काही प्रमाणात अंकुर उगवले असले तरी काही बियाणे मात्र जमीनीच्या उदरात राहीले.उगवेलेले अंकुर व बियाणे उकरुन रानडुकरे व माकडांच्या कळपाने ध्वस्त केले आहे. शासनाने आर्थीक मदत करून शेतकर्‍यांची बाजू बळकट करावी, किंवा बियाणे मोफत द्यावे अशा मागणीचे निवेदनासह शेतकर्‍यांनी तहसिलदार दिपक पुंडे यांना साकडे घातले आहे.

संबधित वनविभागालाही हे निवेदन प्रतीलीपीत दिले आहे.शिवसेनेचे बाळापूर तालूका प्रमुख संजय शेळके, आनंद बनचेरे, डि.पी.डिवरे यांच्यासह नामदेव वालूरकर, सुरेश वानखडे, संतोष लोड, ज्ञानदेव डिवरे, सुरेश खेडकर, दादाराव डिवरे, निलखंन वानखडे, गजानन डिवरे, श्रीकृष्ण गावंडे, ज्ञानदेव डिवरे, गणेश किनेकर, प्रकाश वानखडे, महादेव वानखडे, वैभव ढाकरे यांच्या स्वाक्षर्‍या निवेदनावर आहेत.